मीनाताई ठाकरे रंगायतनच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:23 IST2021-03-11T00:23:17+5:302021-03-11T00:23:46+5:30
भिवंडी पालिकेचे दुर्लक्ष

मीनाताई ठाकरे रंगायतनच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त मिळेना
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहरातील तीन वर्षांपासून बंद असलेल्या मीनाताई ठाकरे रंगायतनच्या दुरुस्तीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे येथील नाट्यरसिकांनी मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, हे नाट्यगृह बाजारपेठेत अडगळीच्या ठिकाणी असल्याने या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च न करता कामतघर येथील वऱ्हाळ तलाव परिसरात नव्याने रंगायतन उभारावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मनोज काटेकर यांनी केली आहे.
१२ मार्च रोजी होणाऱ्या ऑनलाइन महासभेच्या पटलावर हा विषय ठेवण्यात आला आहे. भिवंडीतील मध्यवर्ती ठिकाणी १९९६ मध्ये मीनाताई ठाकरे हे भलेमोठे नाट्यगृह बांधले. परंतु बाजारपेठेतील अरुंद रस्ते व दाटीवाटीमुळे येथे पोहोचण्यासाठी नाट्यकर्मींना होत असलेल्या त्रासापाई या ठिकाणी सुरुवातीपासून नाट्यकर्मी कधी फिरकलेच नाहीत. त्यामुळे हे नाट्यगृह शहरातील शाळा, महाविद्यालय यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह सभा, संमेलन याच कामी उपयोगी आले. नाट्यगृहाच्या देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केल्याने या नाट्यगृहाची वाताहत झाली आहे. तीन वर्षांपूर्वी एका खिडकीचे तावदान निखळून पडल्याने अपघात झाल्याने तेव्हापासून हे नाट्यगृह सार्वजनिक वापरासाठी बंद ठेवले आहे. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च अपेक्षित असताना व महापालिका प्रशासनाची खर्च करण्यासाठी मानसिकता नसल्याने मनपा प्रशासन सरकारी निधीकडे डोळे लावून बसले आहेत.
दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत या नाट्यगृह दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपये खर्चास मान्यता दिली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने खर्चाचा आराखडा १३ कोटींचा तयार केला, मात्र या आराखड्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हे नाट्यगृह धूळखात आहे. याबद्दल रसिकांनी खेद व्यक्त केला आहे.
नवे नाट्यगृह रसिक, नाट्यकर्मींसाठी सोयीस्कर
काटेकर यांनी या नादुरुस्त व २५ वर्षं जुन्या नाट्यगृहावर खर्च करणे हे अयोग्य असून त्यापेक्षा २० कोटी खर्च करून नवे नाट्यगृह वऱ्हाळ तलाव परिसरात उभारावे त्यासाठी सुयोग्य जागा या परिसरात उपलब्ध असून हे ठिकाण नाट्यकर्मी व नाट्यरसिक या दोघांसाठी सोयीस्कर आहे. याबाबत प्रशासनाने पाठपुरावा केल्यास राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होऊ शकतो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.