महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा अडकली आर्थिक कचाट्यात
By Admin | Updated: June 28, 2017 03:19 IST2017-06-28T03:19:13+5:302017-06-28T03:19:13+5:30
यंदाची महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा प्रयोजकाविना घेण्याची ग्वाही महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली असली तरी अवघ्या ३० लाखात ती कशी पार पाडायची

महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा अडकली आर्थिक कचाट्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदाची महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा प्रयोजकाविना घेण्याची ग्वाही महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली असली तरी अवघ्या ३० लाखात ती कशी पार पाडायची असा पेच पालिकेचा क्रीडा विभाग आणि आयोजकांना पडला आहे. त्यामुळे या संदर्भात ६५ लाखांच्या खर्चाचे पत्र क्रीडा विभागाने महापौरांना दिले आहे. परंतु, त्यावर अद्यापही तोडगा न निघाल्याने स्पर्धा लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मागील वर्षी इव्हेंट मॅनेजमेंटचे स्वरुप प्राप्त करुन देतांना प्रायोजकांच्या मेहरबानीवर २७ वी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. याचा खर्च साधारणपणे ६५ लाखांच्या घरात गेला होता. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात प्रायोजकांच्या मदतीची अपेक्षा ठेवून ५० लाखांची तरतूद ३० लाखांची करण्यात आली आहे. परंतु, आता लोकप्रतिनिधी अथवा महापौर कोणत्याही प्रकारचे प्रायोजक शोधणार नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ३० लाखात स्पर्धा घेण्याचे आव्हान आता प्रशासनापुढे असणार आहे.
दरम्यान या स्पर्धेसाठी साधारणपणे ६५ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगून आयोजक आणि पालिकेच्या क्रीडा विभागाने महापौरांना पत्रदेखील दिले असून हा खर्च कोणकोणत्या साहित्यावर कशा पद्धतीने होणार याचे बजेटच त्यात मांडले आहे. त्यानुसार आतापर्यंत तीन ते चार वेळा महापौरांना विनवनीदेखील केली आहे. परंतु, अद्यापही त्यांच्याकडून होकार न आल्याने स्पर्धा वेळेत होणार की नाही? याबाबतही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. प्रायोजक बघायचे असतील तर ते प्रशासनाने बघावेत महापौर अथवा एकही लोकप्रतिनिधी प्रायोजक शोधण्याच्या भानगडीत पडणार नसल्याचे महापौरांनी संबधींत विभागाला स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकीकडे इव्हेंटचे स्वरुप देऊ पाहणाऱ्या प्रशासनाला मोठी चपराक बसणार आहे.