महापौर, सत्ताधा-यांचा अट्टहास , आजपासून विद्यार्थी नव्या इमारतीत गिरवणार धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:40 IST2018-01-18T00:40:39+5:302018-01-18T00:40:49+5:30
पालिका शाळा क्रमांक १३ व १४ चे अधिकृत उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होण्याचा अट्टहास महापौर मीना आयलानी यांच्यासह सत्ताधारी पक्षांनी धरला आहे

महापौर, सत्ताधा-यांचा अट्टहास , आजपासून विद्यार्थी नव्या इमारतीत गिरवणार धडे
सदानंद नाईक
उल्हासनगर : पालिका शाळा क्रमांक १३ व १४ चे अधिकृत उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होण्याचा अट्टहास महापौर मीना आयलानी यांच्यासह सत्ताधारी पक्षांनी धरला आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या वतीने शाळेचे उद्घाटन झाले असून उद्यापासून मुले शिक्षणाचे धडे नवीन इमारतीत गिरवणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या शाळांची पुनर्बांधणी साडेचार कोटींच्या निधीतून करण्यात आली. इमारतीचे काम पूर्ण झाल्यावरही मुलांना लहानशा खोलीत बसवण्यात येत होते.
विद्यार्थ्यांना नवीन इमारतीतील प्रशस्त खोल्यांमध्ये धडे गिरवता यावे, म्हणून बोडारे यांनी पुढाकार घेतला. गेल्या आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन केल्यावर शिवसेना व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला. शाळा उद्घाटनापूर्वी महापौर आयलानी यांनी बोडारे यांची समजूत काढत शिक्षणमंत्री यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे आदींच्या हस्ते उद्घाटन करू या, असे
सांगितले.
महापौरांच्या विनंतीला सेनेने केराची टोपली दाखवत मुलांच्या भविष्यासाठी खासदार शिंदे, आमदार बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन उरकून घेतले. श्रेयाच्या वादात शिवसेनेने बाजी मारल्याने सत्ताधारी पक्षात नाराजी पसरली.
महापौरांनी उद्या उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी आदींची बैठक बोलावली आहे.
बैठकीत शाळेच्या उद्घाटनाची तारीख ठरवण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाल्या. तर, शिवसेनेने नवीन शाळा इमारतीची साफसफाई करून उद्यापासून मुले शिक्षणाचे धडे गिरवणार असल्याचे बोडारे यांनी सांगितले.