मैदान आरक्षणावरून महापौर-सभापतीच मैदानात
By Admin | Updated: February 7, 2017 03:59 IST2017-02-07T03:59:54+5:302017-02-07T03:59:54+5:30
भार्इंदर पश्चिमेला असलेले सुभाषचंद्र बोस मैदान भाड्याने देण्यासाठी त्याच्या आरक्षणावरुन महापौर गीता जैन आणि प्रभाग समिती सभापती

मैदान आरक्षणावरून महापौर-सभापतीच मैदानात
मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेला असलेले सुभाषचंद्र बोस मैदान भाड्याने देण्यासाठी त्याच्या आरक्षणावरुन महापौर गीता जैन आणि प्रभाग समिती सभापती आसिफ शेख यांच्यात जुंपली आहे. हे मैदान दोन दिवसांसाठी आरक्षित केल्याची शेख यांचे नावे असलेली नोंद खोडून महापौरांचे स्वीय सहाय्यक प्रशांत पाटील यांनी महापौर आणि स्वत:चा उल्लेख केला
आहे. प्रभाग समिती कार्यालयात
येऊन नोंदवहीत खाडाखोड
करण्याच्या प्रकाराने संतापलेले शेख यांनी ही भाजपाची गुंडगिरी असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.
कचरा आणि मातीचा भराव करुन पालिकेने भार्इंदरच्या पश्चिमेला सुभाषचंद्र बोस मैदान तयार केले आहे. ते आणखी मोठे करण्याचे काम सुरू आहे. या जागेवर पूर्वी मिठागरे होती. शिलोत्र्यांचा त्यावर दावा असला, तरी कोणी पाठपुरावा करत नाही. हे मैदान व परिसर सीआरझेड एक, कांदळवन व पाणथळीने बाधित असताना महापालिका मात्र ठेकेदारांमार्फत सर्रास नव्याने माती भरावाचे काम व बांधकामे करत आहे.
ही जागा शासकीय असून त्यासाठी सरकारने पालिकेकडून पैसेही मागितले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास आणि जागेची मालकी नसताना पालिका मात्र हे मैदान भाड्याने देत आहे. त्यासाठी दिवसाला तीन हजार रुपये भाडे आकारले जाते. त्यातच मैदान भाड्याने घेण्यावरुन वादंग सुरू आहे.
२५ व २६ मार्चला हे मैदान क्रिकेट सामन्यांसाठी भाड्याने मिळावे म्हणुन गणेश जाधव यांनी २ फेब्रुवारीला प्रभाग समितीचे सभापती आसिफ शेख व प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्याकडे अर्ज केला केला होता. त्यानुसार शेख यांनी हे मैदान त्या दिवशी राखीव ठेवण्याचा शेरा मारुन अर्ज सावंत यांच्याकडे पाठवला. तशी नोंद वहीत करून २५ व २६ मार्चला ते आसिफ शेख यांच्या नावावर राखीव ठेवण्यात आले. याच दोन दिवसांसाठी महापौरांच्या परिचयातील संस्थेला मैदान भाड्यानेहवे होते. त्यावरुन धुसफूस सुरू होती.
शनिवारी सायंकाळी महापौर गीता जैन यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत पाटील यांनी भार्इंदर प्रभाग समिती कार्यालयात जाऊन पालिकेच्या नोंदवहीतील शेख यांचे नाव खोडून टाकले. तसेच दोन्ही तारखांसमोर स्वत:चे नाव व महापौर असे लिहिले. हा प्रकार कळल्याने सभापती शेख संतप्त झाले. त्यांनी शिपाई स्मिता इंगळे यांना बोलावून नोंदवहीतील खाडाखोडीबद्दल आणि परस्पर केलेल्या बदलांबद्दल विचारणा केली. त्यावर इंगळे यांनी या तारखांना मैदान राखीव ठेवण्यासाठी महापौरांचा फोन आला होता आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकानेच जबरदस्तीने नोंदी टाकल्याचे शेख म्हणाले. (प्रतिनिधी)