भिवंडीत साहित्य गेले चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:17+5:302021-04-19T04:37:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : शहरात दुसऱ्या कोरोना लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना सुसज्य आरोग्य यंत्रणा उभी करण्यात भिवंडी ...

Materials were stolen in Bhiwandi | भिवंडीत साहित्य गेले चोरीला

भिवंडीत साहित्य गेले चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : शहरात दुसऱ्या कोरोना लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना सुसज्य आरोग्य यंत्रणा उभी करण्यात भिवंडी मनपा प्रशासनास आजही अपयश आल्याने शहरातील गरीब रुग्णांनाही खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ आली आहे. पालिकेने गेल्यावर्षी पहिल्या कोरोना लाटेत कोट्यवधींचा खर्च करून उभारलेली आरोग्य यंत्रणा आजही कार्यान्वित न केल्याने ही यंत्रणा धूळ खात पडून आहे, तर साहित्यही चोरीला गेल्याच्या तक्रारी नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केल्या आहेत. दुसऱ्या लाटेत फक्त खुदाबक्ष हॉल व वऱ्हाळादेवी हॉल येथील केंद्रे सुरू केली आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही मनपाकडे आज फक्त खुदाबक्ष हॉल व वऱ्हाळादेवी हॉल ही दोनच कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. यापैकी खुदाबक्ष हॉल येथे १३४ बेडचे, तर वऱ्हाळादेवी हॉल येथे १०० बेडचे अशी २३४ बेडची कोविड सेंटर मनपाने उभारली आहेत. भिवंडीत लोकसंख्या पाहता मनपाने केवळ २३४ बेडची दोनच कोविड सेंटर सुरू ठेवल्याने नागरिकांकडून मनपा प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. भिवंडीत मागच्या लाटेत सुरुवातीला मृत्यूचे प्रमाण वाढले होते. मागील मे, जूनमध्ये मृत्युदरही १२ टक्के एवढा होता. रुग्णसंख्या व मृत्युदरात वाढ झाल्याने मागील वर्षी शहरात इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयीसुविधांसह कोविड रुग्णालय सुरू केले होते. त्याचबरोबर शहरात खुदाबक्ष हाॅल, टाटा आमंत्रण, रईस हायस्कूल व वऱ्हाळदेवी हाॅल, ओसवाल हॉल येथेही सुसज्य कोविड सेंटर सुरू केले होते. या सेंटरच्या उभारणीसाठी त्यावेळी कोट्यवधींचा खर्च मनपा प्रशासनाने केला होता. मात्र, त्याचा फायदा झाल्याने त्यावेळी शहरातील मृत्युदर अवघ्या तीन टक्क्यांपर्यंत खाली आला होता.

गेल्यावर्षी सुरू केलेली ही यंत्रणा या वर्षी मनपा प्रशासनाने आजही राबविलेली दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाही गेल्या वर्षात सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील साहित्य धूळ खात पडून आहे, तर अनेक साहित्य चोरी व गायब झाले आहे. एकीकडे ऑक्सिजनविना आज अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत असताना आयजीएम रुग्णालयाबाहेर कोट्यवधी रुपयांचे ऑक्सिजन टँक फक्त काय शोभेसाठी लावले आहेत का, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत. आयजीएम रुग्णालयात ४५ व्हेंटिलेटर व टेली आयसीयूसारख्या अत्याधुनिक सुविधा असताना त्या यंत्रणा धूळ खात आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत पालिकेने टाटा आमंत्रण येथील विलगीकरणसह भिवंडी शहरात खुदाबक्ष हॉल, रईस हायस्कूल ,वऱ्हाळदेवी हॉल असे मिळून तब्बल एक हजार बेड रुग्णांसाठी उपलब्ध ठेवले होते .

-------------------------------------

पुरेसे बेड असल्याचा दावा

खासगी रुग्णालयांमध्ये सध्या बेड व ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने रुग्णांची उपचाराविना तडफड होत आहे. भिवंडीत ८२० रुग्णसंख्या असतानाही मनपाचे २३४ बेडचे फक्त दोन कोविड सेंटर शहरात अस्तित्वात आहेत. मात्र, एवढे सर्व असतानाही मनपा प्रशासनाकडे पुरेसे बेड उपलब्ध असल्याचा दावा मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडून केला जात आहे. रुग्णसंख्या वाढली तर गेल्यावर्षी सुरू केलेले कोविड सेंटर मनपा पुन्हा सुरू करेल, अशी ग्वाहीही आयुक्तांनी दिली आहे.

Web Title: Materials were stolen in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.