भाई विरुद्ध ताईमध्ये रंगणार सामना

By Admin | Updated: February 8, 2017 04:12 IST2017-02-08T04:12:09+5:302017-02-08T04:12:09+5:30

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सध्या प्रभाग क्रमांक ५ आणि १४ या दोन प्रभागातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून सुधाकर चव्हाण

Match against brother-in-Tai | भाई विरुद्ध ताईमध्ये रंगणार सामना

भाई विरुद्ध ताईमध्ये रंगणार सामना

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सध्या प्रभाग क्रमांक ५ आणि १४ या दोन प्रभागातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून सुधाकर चव्हाण, अर्थात भाई विरुद्ध आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक (ताई) असा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. तर, प्रभाग क्रमांक १४ मधून शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के विरुद्ध राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक अमित सरय्या अशी ‘कांटे की टक्कर’ पाहावयास मिळणार आहे. या सर्वांतही जे सुधीर बर्गे पूर्वी सरनाईक कुटुंबाच्या जवळ होते. आता ते भाजपात गेले असून त्यांच्या सौभाग्यवती मनीषा यांचा सामना सरनाईक यांचे विद्यमान पीए संदीप डोंगरे यांची पत्नी आशा यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ठाणे महापालिकेची निवडणूकआता खऱ्या अर्थाने रंगतदार स्थितीकडे जात आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये करवालोनगर, सावरकरनगर, यशोधननगर आदींचा भाग येत आहे. चार वॉर्डांचे एक पॅनल झाल्याने येथील बाजूचे वॉर्डही एकत्र आले आहेत. त्यामुळे येथे अतिशय रंगतदार लढत पाहावयास मिळणार आहे. १४ अ मधून आमदार प्रताप सरनाईक यांचे द्वितीय पुत्र पूर्वेश सरनाईक यांचा सामना भाजपाचे बालाजी केंद्रे, राष्ट्रवादीचे सुधाकर नाईक यांच्याशी होणार आहे. ही लढत फारशी रंगतदार मानली जात नाही. परंतु, असे असले तरी आपला उमेदवार येथे टक्कर देईल, असा आशावाद राष्ट्रवादीला आहे. दुसरीकडे सरनाईक यांच्या आजी-माजी पीएंच्या सौभाग्यवतींमध्ये दुसरा सामना होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कमळ फुलणार की धनुष्यबाण, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या दोन लढतींशिवाय शिवसेनेच्या कांचन चिंदरकर यांचा सामना राष्ट्रवादीच्या नीतिका पाटकर आणि भाजपाच्या सिंह बबिता यांच्याशी होणार आहे. तर, १४ ड मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांचा सामना राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक अमित सरय्या यांच्याशी होणार आहे.
मागील निवडणुकीत बारटक्के यांचा १५० मतांनी पराभव झाला होता. तर, या निवडणुकीत बारटक्के यांच्या उमेदवारी अर्जावर सरय्या यांनी आक्षेप घेऊन त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली होती. परंतु, त्यातून बारटक्के बाहेर आले असून आता पुन्हा येथे या दोघांमध्येच कांटे की टक्कर पाहावयास मिळणार आहे.
चार वॉर्डांचे एक पॅनल झाले असल्याने सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक या अपक्ष उमेदवार सुधाकर चव्हाण यांच्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Match against brother-in-Tai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.