दिवाळीनिमित्त मिठाईना बाजारात मागणी
By Admin | Updated: November 9, 2015 02:38 IST2015-11-09T02:38:34+5:302015-11-09T02:38:34+5:30
काजूकतली ही सगळ्यात जास्त मागणी असलेली मिठाई आहे. त्याचप्रमाणे मिठाईपेक्षा ग्राहक चॉकलेट खरेदीकडे वळल्याने सध्या फरेरो सारख्या चॉकलेट्सनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

दिवाळीनिमित्त मिठाईना बाजारात मागणी
भाग्यश्री प्रधान, ठाणे
काजूकतली ही सगळ्यात जास्त मागणी असलेली मिठाई आहे. त्याचप्रमाणे मिठाईपेक्षा ग्राहक चॉकलेट खरेदीकडे वळल्याने सध्या फरेरो सारख्या चॉकलेट्सनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पूर्वी या चॉकलेट्चे फक्त मोठे पॅक मिळायचे ते खूप महाग असल्याने सामान्य ग्राहक त्याच्या खरेदीकडे वळत नव्हते. मात्र आता त्याचे दोन ते ५० चॉकलेटांपर्यंतचे बॉक्स ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भारतामध्ये असलेले सामान्यांचे मार्केट खेचण्यासाठीचा हा प्रयत्न जाणवतो. पानमसाला, ब्ल्यू बेरी, रासबेरी, आॅरेंज, रोझ, ड्रायफ्रुट जेली अशा फ्लेवर्सचा वापर चॉकलेट्स बनवतांना केला जात आहे. तसेच स्ट्रॉबेरी विथ जेली ड्रायफ्रुट मिठाई ही विक्रीसाठी आली असून ती ग्राहकांचे आकर्षण ठरली आहे. या मिठाईमध्ये काजूचा वापर कमी असल्याने आणि जेलीचा वापर जास्त असल्याने ती ३५० रुपये किलो आहे.
मिठाईचे गिफ्ट बॉक्स साधारण २०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत साईज व क्वॉलिटीनुसार उपलब्ध आहेत. तसेच काजूकतली या मिठाईमध्येही अंजीर काजुकतली, स्ट्रॉबेरी काजुकतली, मँगो काजुकतली आदी प्रकार उपलब्ध आहेत.तसेच मधुमेह रुग्णांसाठीही खास शुगर फ्री मिठाई तयार करण्यात आली आहे.त्यात खजूर बर्फीचा समावेश आहे. ड्रायफ्रुटच्या दर्जेनुसार त्याच्या बॉक्सची किंमत अवलंबून आहे. तसेच बॉक्स किती मोठा आहे यानुसारही त्याच्या किंमती आहेत. या बॉक्सबरोबरच चॉकलेट्चेही बॉक्स केले जातात. या बॉक्समध्ये जेम्स पासून ते विविध प्रकारच्या चॉकलेट्सचे प्रकार उपलब्ध आहेत. या चॉकलेटांमध्ये मीकी माऊस, छोटा भीम आदी कार्टून्सचे आकारही उपलब्ध असल्याने बच्चे कंपनीमध्येही त्याची क्रेझ असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी बॉक्स ऐवजी कंटेनर मध्ये ड्रायफ्रूट देण्याचाही ट्रेंड आहे.यामुळे डबल गिफ्ट्स देण्याचे समाधानही मिळते.
एके काळी लोकप्रिय असलेल्या जिलेबी, बुंदीचे लाडू, म्हैसूर पाक, सोनपापडी, बालूशाही हे मिठाईचे प्रकार मागे पडलेत. बंगाली आणि डिझायनर मिठाईला अधिक मागणी आहे. कमी खा, पण चांगले खा त्यातही नॉव्हेल्टी आणा. अशी मानसिकता असल्याने बत्तीसशे रुपये किलोपर्यंतच्या मिठाईलाही मागणी आहे.
मिठाईचा बॉक्स म्हणजे पुठठ्याचा खोका ही संकल्पनाही मागे पडली. अलिकडच्या काळात ही बॉक्सही डिझाईन केलेले असतात. त्याची किंमतही भरपूर महाग असते. काही ठिकाणी तर कंटनेरमध्येच मिठाई गिफ्ट केली जात असते.