मराठमोळा ऑनलाइन नाट्यप्रयोग जर्मनीतही हिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:54 IST2021-02-27T04:54:33+5:302021-02-27T04:54:33+5:30
मराठी राजभाषा दिनविशेष स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे - या लॉकडाऊनच्या काळात आपण अनेक गोष्टी ऑनलाइन केल्या. शाळेचे ...

मराठमोळा ऑनलाइन नाट्यप्रयोग जर्मनीतही हिट
मराठी राजभाषा दिनविशेष
स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे - या लॉकडाऊनच्या काळात आपण अनेक गोष्टी ऑनलाइन केल्या. शाळेचे वर्ग, ऑफिसचे काम ते घरात लागणाऱ्या वस्तूंच्या ऑर्डरपर्यंत सगळंच. अगदी नाटक, गाण्यांचे शोसुद्धा. या लॉकडाऊनमध्ये कल्याण-डोंबिवलीच्या नाट्यप्रेमी युवकांनी तयार केलेल्या ‘बीफोर द लाइन’ या मराठमोळ्या नाट्याचे ऑनलाइन प्रयोग झाले, ते भारताबरोबरच अगदी थेट जर्मनीतही. त्याला तेथेही तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास संपूर्ण जगभर लॉकडाऊन असताना त्या काळातही मराठी नाट्याने परदेशांतील लोकांचे मनोरंजन करत आपले वेगळे अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. इतकेच नव्हे तर हीच नाट्यप्रेमी युवकांची टीम पुन्हा लॉकडाऊन झाले किंवा नाही, तरीही पुन्हा आपला येणारा नवीन दीर्घांक जर्मनीसह इतरही काही देशांत ऑनलाइन सादर करण्याच्या विचारात आहे.
लॉकडाऊनमध्ये नाट्यगृह बंद होते, पण नाटक थांबवून चालणार नाही. आपण नाटक घेऊन रसिकांपर्यंत पोहोचावे, हे लक्षात घेत स्टोरिया प्रॉडक्शन यांनी ऑनलाइन नाट्यप्रयोग करण्याचा विचार केला. तेव्हाची परिस्थिती आणि प्राप्त साधनांच्या साहाय्याने त्यांनी नाटक बसवले आणि त्याचे ऑनलाइन प्रयोग केले. भारताबरोबरीनेच जर्मनीतही याचे प्रयोग सादर करण्याचे ठरवून तिथे ‘मराठी अस्मिता जर्मनी’ या संस्थेच्या माध्यमातून ते सादरसुद्धा झाले. मात्र, पहिल्या ऑनलाइन प्रयोगात काही तांत्रिक अडचणी आल्याने तेथील रसिकांना तो प्रयोग नीट पाहता आला नाही. त्यामुळे या टीमने प्रयोगाचे नाममात्र असलेले शुल्कही सगळ्यांना परत करून दुसऱ्या दिवशी ‘बीफोर द लाइन’चा मोफत प्रयोग दाखवला आणि त्याला तेथील प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. नितीन सावळे, नचिकेत दांडेकर, यश नवले, राजेश शिंदे या टीमने यासाठी भरपूर मेहनत घेतली.
----------------
आता पुन्हा नाट्यगृहे सुरू झाली आहेत. त्यामुळे आता नव्याने नाट्यप्रयोग नाट्यगृहातच करण्यावर भर असेल. मात्र, लॉकडाऊन झाले किंवा नाही, तरी आम्ही आमच्या नवीन प्रसाद दाणी लिखित आणि संकेत पाटील, राजरत्न भोजने दिग्दर्शित एका मराठी दीर्घांकाच्या तालमीची मराठी राजभाषा दिनाच्या दिवशीच सुरुवात करीत आहोत, त्याचाही ऑनलाइन प्रयोग जर्मनी आणि इतरही काही देशांत करणार असल्याचे या टीमने सांगितले.