घाणेकर नाट्यगृहाच्या लिफ्टमध्ये अडकला मराठी दिग्दर्शक विजू माने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 04:48 PM2019-12-02T16:48:38+5:302019-12-02T16:48:46+5:30

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे.

Marathi director Viju Mane stuck in the elevator of the Ghanekar theater | घाणेकर नाट्यगृहाच्या लिफ्टमध्ये अडकला मराठी दिग्दर्शक विजू माने

घाणेकर नाट्यगृहाच्या लिफ्टमध्ये अडकला मराठी दिग्दर्शक विजू माने

Next

ठाणे  - डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने हे व्हीआयपी लिफ्टमधून जात असताना लिफ्ट मध्येच बंद पडल्याची घटना घडली. सुदैवाने 15 मिनिटांच्या कालावधीनंतर त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. परंतु त्यांनी या प्रकाराचा संताप थेट फेसबुक शेअर केल्याने घाणेकर नाट्यगृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सोमवारी सकाळी घाणेकर नाट्यगृहात आनंद विश्व गुरुकुल शाळेचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विजू माने यांना सुद्धा आमंत्रण होते. दरम्यान ते सकाळी 10 वाजता या ठिकाणी पोहोचले असता, सुरक्षारक्षकाने त्यांना व्हीआयपी लिफ्टमधून नेण्यास सुरुवात केली. मात्र लिफ्ट पहिल्या आणि दुस-या मजल्याच्या मध्ये असतानाच अचानक बंद पडली. मध्येच लिफ्ट गचके घेऊ लागली. अखेर आरडाओरड सुरू झाल्यानंतर इतर सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी अक्षरश: बाहेर खेचून काढल्याचे माने यांनी सांगितले.

जवळ जवळ 15 मिनिटे त्या लिफ्टमध्ये अडकून पडल्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार थेट फेसबुकवर शेअर केला, यामध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आणि दुरवस्था ही युती कधीच तुटणार नाही. आज माझ्यावरचा जीवघेणा प्रसंग टळला. उद्याचं माहिती नाही, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकला टाकली आहे. एकूणच पुन्हा एकदा घाणेकर नाट्यगृहाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले असून, प्रशासन आता याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे ज्या कार्यक्रमाला माने उपस्थित होते, त्याच कार्यक्रमाला महापौर नरेश म्हस्के देखील हजर होते. त्यामुळे घडला प्रकार त्यांनी म्हस्के यांच्या कानावर घातला आहे.

Web Title: Marathi director Viju Mane stuck in the elevator of the Ghanekar theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.