डोंबिवलीतील रस्ता रुंदीकरणाला मनसेचा विरोध
By Admin | Updated: September 13, 2016 02:23 IST2016-09-13T02:23:50+5:302016-09-13T02:23:50+5:30
डोंबिवलीत आॅक्टोबरपासून सुरू होणारी केडीएमसीची रस्ता रुंदीकरण मोहीम वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. रुंदीकरण कशाला हवे, असा सवाल करत मनसेने या मोहिमेला विरोध दर्शवला आहे.

डोंबिवलीतील रस्ता रुंदीकरणाला मनसेचा विरोध
कल्याण : डोंबिवलीत आॅक्टोबरपासून सुरू होणारी केडीएमसीची रस्ता रुंदीकरण मोहीम वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. रुंदीकरण कशाला हवे, असा सवाल करत मनसेने या मोहिमेला विरोध दर्शवला आहे. या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पालिकेने काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यान रस्ता रुंद केला होता. आता डोंबिवलीतील केळकर रोड व दीनदयाळ रोडच्या रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यासाठी १ आॅक्टोबरची तारीख महापालिका प्रशासनाने निश्चित केली आहे. त्यासाठी बाधित होणारे व्यापारी व रहिवासी अशा २२५ जणांना केडीएमसीने नोटिसा बजावल्या आहेत. कल्याणमध्ये कारवाईला तीव्र विरोध झाला होता, याची पुनरावृत्ती आता मनसेच्या विरोधी भूमिकेमुळे डोंबिवलीतही होण्याची दाट शक्यता आहे.
केळकर रोडवर २७ इमारती आहेत. यापूर्वी या रस्त्याचे दोनदा रुंदीकरण झाले. आता पुन्हा रुंदीकरणाचा घाट घातला जाणार असल्याने व्यापारी व रहिवाशांत तीव्र नाराजी आहे. सध्या हा रस्ता १४ ते १५ मीटर रुंद आहे. तो आता १८ मीटर रुंद केला जाणार आहे. रुंदीकरणात सहा ते आठ फूट बांधकामे बाधित होणार आहे. यात काही इमारतींचे जिने तसेच कॉलमलाही धक्का बसणार आहे. यामुळे इमारतींचे बांधकाम कमकुवत होण्याची भीती बाधितांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, महापालिकेच्या या कारवाईला मनसेने विरोध केला आहे. फेरीवाला आणि रिक्षाचालकांसाठी रुंदीकरण नको. चुकीच्या रुंदीकरणाला समर्थन देणार नाही. अगोदर दोनदा केळकर रस्त्यावर रुंदीकरण झाले. त्याचा फायदा कोणाला झाला, असा सवाल मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी उपस्थित केला आहे. रुंदीकरणाऐवजी डोंबिवलीत वाहतुकीचे धोरण ठरवा. नेहरू रोड फेरीवाल्यांना आंदण दिलाय, तो आधी मोकळा करा. ठाणे रेल्वेस्थानकाच्या धर्तीवर एकच रिक्षा स्टॅण्ड करा, अशी मागणी करताना महापालिकेची डोंबिवली विभागीय कार्यालयाची नवीन वास्तू बांधताना तेथील काही जागा वाहतुकीसाठी पार्किंगसाठी आणि रिक्षा-बस स्टॅण्डसाठी मोकळी ठेवा, अशी सूचना कदम यांनी केली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर लवकरच आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)