मनोमय फाउंडेशन सत्काराच्या खर्चातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार
By Admin | Updated: September 21, 2015 14:43 IST2015-09-21T03:37:34+5:302015-09-21T14:43:13+5:30
खेवरा सर्कल येथील मनोमय फाउंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही भव्य मयूरमहालाचा देखावा साकारला आहे. चार हजार पाचशे चौरस फुटांच्या या महालात ‘

मनोमय फाउंडेशन सत्काराच्या खर्चातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार
जितेंद्र कालेकर, ठाणे
खेवरा सर्कल येथील मनोमय फाउंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही भव्य मयूरमहालाचा देखावा साकारला आहे. चार हजार पाचशे चौरस फुटांच्या या महालात ‘लालबागचा राजा’ प्रतिकृतीच्या ११ फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या मंडळाकडे यंदाही परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. यंदा खर्चात काटकसर करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्याचे नियोजन या मंडळाने केले आहे.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहापासून जवळच असलेल्या या मंडळाचा मयूरमहाल यंदाही आकर्षण ठरला आहे. मंडळाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. दिनेश चौरसियांच्या ५० ते ६० जणांच्या कलाकारांनी गेल्या दीड महिन्यात विशेष मेहनतीने हा महाल साकारला आहे. वाहतुकीचे नियम आणि न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे एकतृतीयांश रस्ता मंडपासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा मंडपाची जागाही बदलून पाच हजारांऐवजी साडेचार हजार चौरस फुटांच्या जागेत तो उभारला आहे. संपूर्ण मंडप ठाणे महापालिकेच्या परवानगीने उभारल्याचा दावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामध्ये १४ फूट उंचीच्या आठ महिरप कमानी आहेत. त्या कमानींसह भिंतींवर उत्कृष्ट कलाकुसर आहे. आकर्षक रंगसंगती, पडदे आणि एकूणच सर्व भव्यतेमुळे या महालाचे काम एखाद्या राजमहालाला साजेसे झाले आहे. विशेष म्हणजे खड्डेविरहित मंडप उभारण्याची गेल्या पाच वर्षांची परंपरा यंदाही कायम आहे. केवळ लोखंडी अँगलच्या आधारे नटबोल्टच्या फिटिंगने तसेच जॉक सिस्टीमने मंडप उभारला आहे. मंडळाने अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. शिवाय, एलईडी दिव्यांच्या वापरामुळे प्रखर उजेडाबरोबर विजेची बचत करण्यात आली आहे. आकर्षक रंगसंगतीच्या रोषणाईने या देखाव्याला देखणे रूप आले आहे. बांधकाम व्यावसायिकांसह अनेक बड्या व्यावसायिकांच्या दातृत्वामुळे मंडळाकडे दरवर्षी काही लाखांमध्ये वर्गणी जमा होत असते. तर, दानपेटीतही साधारण तीन ते चार लाखांची रक्कम जमा होते. यंदा मात्र देणगीदारांनी हात आखडता घेतल्याचे मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. यंदा मयूरमहालाचा मंडप, डेकोरेशन आणि रोषणाईसाठी दहा लाखांचा खर्च केला आहे. नुसत्या मंडपासाठी सहा लाख तर मूर्तीसाठी ४० हजारांचा खर्च झाला आहे. लालबागच्या राजाची मूर्ती साकारणारे संतोष कांबळी यांनीच ही मूर्ती साकारली आहे. या गणेशाच्या दर्शनाने लालबागच्या गणेशाचे दर्शन घेतल्याचा भास होतो, इतकी साम्यता या दोन्ही मूर्तींमध्ये आहे.