मनसे शहराध्यक्षांचे एकला चलो रे?
By Admin | Updated: April 26, 2017 23:49 IST2017-04-26T23:49:17+5:302017-04-26T23:49:17+5:30
केडीएमसीच्या क्रीडासंकुलातील तरणतलाव आणि शिवाजी उद्यानातील तीन वर्षांपासून बंद असलेली मोराची गाडी सुरू व्हावी

मनसे शहराध्यक्षांचे एकला चलो रे?
डोंबिवली : केडीएमसीच्या क्रीडासंकुलातील तरणतलाव आणि शिवाजी उद्यानातील तीन वर्षांपासून बंद असलेली मोराची गाडी सुरू व्हावी, यासाठी मनसेने आक्रमक होत आंदोलने केली. त्याचबरोबर रेल्वे स्थानकातील मधल्या पादचारी पुलाखालील कचऱ्याला लागलेल्या आगीची दखल घेत रेल्वे स्थानक प्रबंधकांची भेट घेतली. मात्र, या सर्व प्रकारांत पक्षातील निवडक पदाधिकारीच सहभागी झाले होते. नगरसेवक व कार्यकर्त्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याची सर्वत्र चर्चा होती. त्यामुळे शहराध्यक्ष मनोज घरत यांची ‘एकला चलो रे’ भूमिका सुरू आहे, अशी कुजबूज पक्षातील कार्यकर्त्यांत आहे.
आयत्या वेळेवर ठरवून आंदोलने केली जातात का, असा नाराजीचा सूर कार्यकर्त्यांमध्ये होता. कौटुंबिक उपक्रम तसेच वाहतूककोंडीमुळे आंदोलनात सहभागी होता आले नाही, अशी सबब काही नगरसेवकांनी दिली. ऐनवेळी व्हॉट्सअॅपवर उपक्रम कळवले जातात. त्यामुळे तातडीने त्यात सहभागी होता येत नाही. नियोजनाशिवाय आंदोलने यशस्वी कशी होतील, असा सवाल त्यांनी विचारला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणे यशस्वी होण्यामागे नियोजन आणि आखणीबद्ध कार्यक्रम हे महत्त्वाचे असते. तसे नियोजन येथील आंदोलनांमध्ये का दिसत नाही? बहुतांशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आंदोलन झाल्यावर व्हॉट्सअॅपवरील फोटो तसेच सोशल मीडियावरील चर्चेमुळे माहिती मिळत असल्याचेही कार्यकर्ते म्हणाले.
केडीएमसीत मनसेचे १० नगरसेवक आहेत. कार्यकर्तेही मोजकेच उरले आहेत. पक्षाचे दोन मोठे पदाधिकारी येथे वास्तव्याला आहेत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रपणे एखादा विषय हाताळला, आंदोलने केली आणि त्यातून यश मिळाले, असे का दिसत नाही, अशीही कुजबूज पक्षात सुरू आहे. मध्यंतरी एका कार्यकर्त्याने संगीतावाडी परिसरात सुरू केलेल्या पक्षाच्या कार्यालयाचे थाटामाटात उद्घाटन झाले. त्यावेळी बहुतांशी सगळेजण उपस्थित होते, ती उपस्थिती नियोजनामुळे होती. पण, आठवडाभरातील आंदोलने, भेटीगाठीमध्ये मात्र ते नियोजन सपशेल ढासळल्याची खंत व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)