सुट्टी असूनही मॉलमध्ये गर्दी नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:45 IST2021-08-17T04:45:43+5:302021-08-17T04:45:43+5:30
कल्याण : राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आजपासून सर्व मॉल्सना रात्री दहा वाजेपर्यंत सूट दिली आहे. मात्र ...

सुट्टी असूनही मॉलमध्ये गर्दी नाही...
कल्याण : राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आजपासून सर्व मॉल्सना रात्री दहा वाजेपर्यंत सूट दिली आहे. मात्र सुट्टीचा दिवस असतानाही रविवारी कल्याणच्या मेट्रो मॉलमध्ये गर्दी दिसून आली नाही. कारण दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांनाच मॉल्समध्ये खरेदीसाठी प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे मॉल्समध्ये गर्दी कमी आहे. सूट दिली आहे. मात्र दोन डोसची अटही लादल्याची प्रतिक्रिया मॉलमधील शॉपचालकांनी व्यक्त केली आहे. ही अट शिथिल केली तर मॉलमधील व्यवसायाला गती मिळू शकते याकडे शॉपचालकांनी लक्ष वेधले आहे.
मॉलचे व्यवस्थापक सुधीर यांनी सांगितले की, कल्याण आणि आसपासच्या परिसरात मेट्रो मॉल हा सगळ्य़ात मोठा आहे. या मॉलमध्ये ६५ पेक्षा जास्त दुकाने आहेत. त्यात बिग बाजार, सिने थिएटर असे सगळे आहे. या मॉलमध्ये जवळपास ५ हजार कामगार काम करतात. कोरोना सुरू झाला तेव्हा सहा महिने मॉल बंद होता. त्यानंतर सूट दिली होती. पुन्हा दुसरी लाट आल्यावर निर्बंध लादले गेले. पुन्हा मॉल बंद झाला. आता १५ ऑगस्टपासून दोन डोस घेणाऱ्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला आहे. मात्र दोन डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रविवारी सुट्टीचा दिवस असूनही मॉलमध्ये शुकशुकाट होता. रात्री १० वाजेपर्यंत मॉल सुरू ठेवण्याची सूट दिली. त्याचे आम्ही स्वागत केले. मात्र २ डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यास सांगण्यात आल्याने ग्राहक कसा काय मॉलमध्ये खरेदीसाठी वळणार? या नियमात काही तरी शिथिलता देण्याचा विचार सरकारने केला पाहिजे. मेट्रो मॉल महापालिकेस १ कोटी रुपये मालमत्ता कर भरतो. त्याचबरोबर जाहिरातीच्या स्वरूपात महापालिकेस ५० लाखांपेक्षा जास्त कर मिळतो. कोरोना प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी मॉलची महिन्याची उलाढाल २५ कोटी रुपयांची होती. हे सगळे कोरोनाकाळात ठप्प होते. मॉलवर अवलंबून असलेल्या पाच हजार कामगारांचा रोजगारही त्यामुळे धोक्यात आला. सूट दिली तरी त्याचा आम्हाला काही फायदा होत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
------------------