खाजगीकरणातून मेक इन ठाणे
By Admin | Updated: February 17, 2016 02:05 IST2016-02-17T02:05:23+5:302016-02-17T02:05:23+5:30
मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या सामान्य करात अपेक्षेप्रमाणे १० टक्यांची वाढ करतांना, ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच वास्तववादी आणि लोकाभिमुख असा २०१६-१७ चा २५४९.८२ कोटींचा अर्थसंकल्प

खाजगीकरणातून मेक इन ठाणे
ठाणे : मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या सामान्य करात अपेक्षेप्रमाणे १० टक्यांची वाढ करतांना, ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच वास्तववादी आणि लोकाभिमुख असा २०१६-१७ चा २५४९.८२ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. उत्पन्नाचा मर्यादित स्त्रोत विचारात घेता काही प्रकल्प पीपीपी, सामाजिक दायित्व, खाजगी लोकसहभाग आणि कन्स्ट्रक्शन टीडीआरचा आधार घेत पूर्ण केले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटी, अमृत योजना यासाठी पालिकेच्या हिश्श्याची तरतूद करुन प्रथमच स्मार्ट मोबिलिटी, रोबोटिक मशीनद्वारे नाले आणि जलकुंभाची सफाई, नवीन मॉडेल रस्ते विकसित करणे, पाच नवीन पार्क, शहीद जवानांच्या वीरपत्नींसाठी आर्थिक मदत, आरोग्य सेवेचे संगणकीकरण, महिला व अपंगांसाठी विशेष योजना, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्यावर भर, महापालिका शाळेतील मुलींसाठी स्वतंत्र शौचालये, रस्ता रुंदीकरण आणि नुतनीकरण, मिनी मॉल, इनलँड वॉटर ट्रान्स्पोर्ट (जेटी सुविधा), कृत्रिम प्रस्तरारोहण, सर्वांसाठी घरे योजना, संकारा नेत्रालय, मेडिटेशन व होलिस्टिक सेंटर, ज्येष्ठांचे नंदनवन, पक्ष्यांंसाठी कृत्रिम घरटी, पोलीस ठाणी बांधणे आदींसह विविध नवे प्रकल्प या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या जललाभ कर, मलनिस्सारण कर, पाणीपट्टीत वाढ केली होती. यंदा सलग दुसऱ्या वर्षी ठाणेकरांवर करवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या सामान्य करात १० टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली असून ही करवाढ निवासी आणि बिगरनिवासी मालमत्ताधारकांना लागू असणार आहे.
आयुक्तांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात मनपाचे उत्पन्न २०८६ कोटी, अनुदाने १७९.८६ कोटी, कर्ज ५३.८६ कोटी, आरंभीची शिल्लक २३०.१० कोटी हे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तर महसुली खर्च १२५१.१८ कोटी, भांडवली खर्च (अ व क अंदाज) १००१.२८ कोटी भांडवली खर्च (जेएनएनयुआरएम) २९७.२१ कोटी आणि शिल्लक १५ लाख असा एकूण खर्च अपेक्षित धरला आहे.