लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय कोकेन या महागड्या अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले असून मीरारोड व वसई भागातून तब्बल १५ किलो कोकेनसह परदेशी चलन असा २२ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन परदेशी नागरिक आणि एका भारतीय महिलेस अटक केली आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक आयुक्त भास्कर पुकळे व मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने हि कारवाई केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या सह उपनिरीक्षक उमेश भागवत व संदीप शिंदे, अशोक पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेद्र थापा, अश्विन पाटील, सुधीर खोत, सचिन हुले, प्रशांत विसपुते, धिरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे, दिपाली जाधव, सायबर गुन्हे शाखेचे संतोष चव्हाण, मसुबचे किरण आसवले यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भाईंदर पूर्वेच्या मोतीलाल नगर मधील सबिना नजीर शेख ( वय ४२ ) या महिलेच्या घरी धाड टाकली.
१५ एप्रिल रोजीच्या धाडीत १७ कोटी ७४ लाख ५० हजार रुपये किमतीचा ११ किलो ८३० ग्रॅम वजनाचा कोकेन अंमली पदार्थचा साठा सापडला. तसेच ८० रुपयांची रोकड सापडली. या प्रकरणी सबिना हिला अटक करून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या कडील चौकशीत, कोकेन साठा हा अँडी उबाबूडीके ओनिनसे ( वय ४५ ) ह्या नायजेरीयन नागरीकाने दिल्याचे समोर आले. मीरारोडच्या हाटकेश भागात राहणाऱ्या अँडीच्या घरी पोलिसांनी धड टाकून त्याच्या कडून ३ कोटी ९० लाख ७२ हजार रुपये किंमतीचा २ किलो ६०४ ग्रॅम इतका कोकेन सापडला. तसेच १ लाख ४ हजारांची रोकड ताब्यात घेतली.
अँडीच्या चौकशीत त्याची वसईच्या एव्हरशाईन सिटी सेक्टर ६ मध्ये राहणार महिला साथीदार क्रिस्टाबेल एंजेल ( वय ४२ ) ह्या केमेरुन देशाच्या नागरिक महिलेस पकडण्यात आले. तिच्या कडून ६४ लाख ९८ हजार रुपयांचा ४३३ ग्रॅम कोकेन सापडला. तिच्याकडून १ लाख रोखसह नायजेरियन देशाच्या नायरा आणि अमेरिकेचे डॉलर असे परकीय चलन सुद्धा सापडले.
कोकेनच्या साठ्यात पोलिसांना २६८ कोकेन असलेल्या कॅप्सूल देखील सापडल्या आहेत. त्यामुळे परदेशातून ह्याची तस्करी केली गेल्याची दाट शक्यता असून सदर कोकेन कुठून आणले व ते विक्री करण्याचे रॅकेट याचा शोध पोलीस घेत आहेत.