ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे कृषी विभागाच्या गुण नियंत्रण शाखेने मोठी कारवाई करत शेतकऱ्यांसाठी असलेला अनुदानित कृषी युरिया खताचा काळाबाजार उघड केला आहे. या कारवाईत एकूण एक कोटी २८:लाख ३१ हजार ७३६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, औद्योगिक वापरासाठी तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात आली,असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी लोकमतला सांगितले.
दोन ट्रकसह मोठ्या प्रमाणावर युरिया साठा हस्तगत
तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक विवेक दोंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, आणि गुण नियंत्रण निरीक्षक बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या मदतीने ही छापामार मोहिम राबवण्यात आली.
मुंबई-नाशिक महामार्गावर एक अशोक लेलँड ट्रक संशयास्पद वाटल्याने, पोलीस अंमलदार दादासो एडके यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला. दोंदे घटनास्थळी दाखल झाल्यावर, ट्रकमधील टेक्निकल ग्रेड युरिया व शेतकऱ्यांसाठीच्या अनुदानित युरियात फेरफार केल्याचे लक्षात आले. चौकशीत ट्रकचालकाने उडवा-उडवीची उत्तरे दिली आणि सदर खत लॉजिस्टिक पार्कमधील गोडाऊनमधून भरले असल्याचे सांगितले.
गोडाऊनवर छापा – री-पॅकिंग करताना ९ कामगार रंगेहात पकडले
त्यानंतर, कृषी विभाग आणि पोलिसांनी मिळून सदर गोडाऊनवर छापा टाकला असता, तिथे टेक्निकल ग्रेड युरिया खताच्या गोण्यांमध्ये अनुदानित युरिया भरून री-पॅकिंग करताना ९ कामगार आढळले.
तपासणीदरम्यान खालील साठा आढळून आला:
टेक्निकल ग्रेड युरिया (पांढऱ्या गोणीत): १२१८ गोण्या
अनुदानित कृषी युरिया (पिवळ्या गोणीत): ५१ गोण्या
संशयित औद्योगिक युरिया: १४०० गोण्या
दोन अशोक लेलँड ट्रक
युरिया गोण्यांचे रिकामे बॅग्ज, शिलाई मशीन, नायलॉन दोरी व इतर साहित्य
संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत – १२८३१७३६ रुपये इतकी आहे.
१६ आरोपींवर गुन्हा दाखल
या प्रकरणी एकूण १६ आरोपींवर खालील कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत:
1. खत नियंत्रण आदेश, 1985
2. खत वाहतूक नियंत्रण आदेश, 1973
3. जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955
4. भारतीय न्याय संहिता, 2023
संपूर्ण साठा आणि साहित्य पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पडघा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे.
शासनाची फसवणूक करून औद्योगिक वापरासाठी अनुदानित युरिया खताचा गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ठाणे कृषी विभागाने वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठ्या आर्थिक फसवणुकीचा बेत उधळून लावला गेला आहे.