आमदारकीची परंपरा राखली, आता मंत्रीपदाची बारी?

By Admin | Updated: February 17, 2016 01:45 IST2016-02-17T01:45:24+5:302016-02-17T01:45:24+5:30

सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून देण्याची परंपरा पालघरवासियांनी अमित घोडा यांच्या रुपाने कायम ठेवली आहे. आता पहिल्यांदा निवडून आल्यानंतर राज्यमंत्री होण्याचा मान मनीषा

Maintains the tradition of the legislature, now the appointment of a minister? | आमदारकीची परंपरा राखली, आता मंत्रीपदाची बारी?

आमदारकीची परंपरा राखली, आता मंत्रीपदाची बारी?

शशी करपे,  वसई
सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून देण्याची परंपरा पालघरवासियांनी अमित घोडा यांच्या रुपाने कायम ठेवली आहे. आता पहिल्यांदा निवडून आल्यानंतर राज्यमंत्री होण्याचा मान मनीषा निमकर आणि राजेंद्र गावीत यांच्यानंतर घोडा यांना मिळतो की नाही ही उत्सुकता पालघरवासीयांना आहे.
पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावीत यांचा पराभव करून शिवसेना-भाजपा युतीचे अमित घोडा यांनी पालघरमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची परंपरा कायम राखली आहे. १९९० पासून, मधला २००९ चा अपवाद वगळता शिवसेनेने पालघरमध्ये आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. १९९० साली राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यावर शिवसेनेच्या तिकीटीवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या मनीषा निमकर राणे सरकारमध्ये राज्यमंत्री बनल्या होत्या. त्यानंतर निमकर सलग तीनवेळा निवडून आल्या.
२००९ साली विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या मनीषा निमकर यांचा पराभव करून काँग्रेसचे राजेंद्र गावीत निवडून आले होते. गावीतांनी शिवसेनेची निवडून येण्याची परंपरा मोडीत काढली होती. यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. गावीत पहिल्यांदाच निवडून आले आणि राज्यमंत्री बनले. राज्यमंत्रीपदाच्या शेवटच्या टप्यात पालघर जिल्हा निर्मिती झाली. या जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री होण्याचे गावीतांचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण होऊ दिले नाही. नव्या पालघर जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री होण्याचा मान त्यामुळे भाजपाचे विष्णू सवरा यांना मिळाला.
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीचे कृष्णा घोडा यांना उमेदवारी दिली. यानिवडणुकीत मोदी लाट होती. त्यामुळे भाजपाने उमेदवार दिला होता. तर बहुजन विकास आघाडीने शिवसेनेच्या मनीषा निमकर यांना आपल्याकडे खेचून त्यांना उमेदवारी दिली होती. मनसेचाही उमेदवार मैदानात होता. असे असतानाही घोडा यांनी सर्वांवर मात करीत गावीतांचा अवघ्या ५१५ मतांनी पराभव करीत विजय खेचून आणला होता. निवडणुकीनंतर काही महिन्यांतच घोडा यांचे निधन झाल्याने पालघरवासियांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागले.
यावेळच्या निवडणुकीत भाजपा मैदानात नसली तरी बहुजन विकास आघाडीने मोठे आव्हान उभे करण्याचे काम केले. काँग्रेसने पुन्हा एकदा राजेंद्र गावीत यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत वाढवण आणि जिंदाल बंदराचा विषय चर्चेला आणून शिवसेनेचे अमित घोडा यांना अडचणीत आणण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न झाले. बहुजन विकास आघाडीने हवा तयार केल्याने रंगत वाढली होती. एकीकडे, शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची करून ताकद पणाला लावली होती.गेल्या दोन्ही निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने गावीतांना पराभवापासून दूर नेण्याचे काम केले. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर गावीतांना राज्यमंत्रीपद मिळाले. तेव्हापासून गावीतांची राजकीय इच्छाशक्ती वाढली होती. पुढे पालघर लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याचे स्वप्न पहात गावीत वसईच्या राजकारणात सक्रीय झाले होते. वसईतील मते नेहमीच निर्णाय ठरत असल्याने गावीतांनी मोर्चेबांधणी सुुरु केली होती. आपल्या बालेकिल्ल्यात गावीतांचा राजकीय धोका त्याचवेळी हितेंद्र ठाकूर यांनी ओळखला होता. तेव्हापासून ठाकूर यांनी गावीतांना रोखण्याची व्यूहरचना आखली होती. अपेक्षेप्रमाणे गावीतांनी पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिल्लीहून मिळवली होती. पण, ठाकूरांनी काँग्रेसचा पाठिंबा मिळवत गावीतांना माघार घेणे भाग पाडले होते. त्यानंतर गावीतांविरोधात दोन्ही निवडणुकांमध्ये उमेदवार देऊन ठाकूरांनी त्यांच्या पराभवात हातभार लावण्याचे काम केले. गावीतांना दोन्ही वेळा राष्ट्रवादी काँग्रेसची किती साथ मिळाली याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: Maintains the tradition of the legislature, now the appointment of a minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.