महावितरणची बिले सापडली कचऱ्यात
By Admin | Updated: June 6, 2016 01:23 IST2016-06-06T01:23:52+5:302016-06-06T01:23:52+5:30
विरार शहरातील महावितरणची विजेची बिले नालासोपाऱ्यातील एका कचरा कुंडीत सापडली आहेत. यामध्ये वसई विरार महापालिका मुख्यालय, विरार पोलीस ठाणे आणि ठाणे जिल्हा

महावितरणची बिले सापडली कचऱ्यात
शशी करपे, वसई
विरार शहरातील महावितरणची विजेची बिले नालासोपाऱ्यातील एका कचरा कुंडीत सापडली आहेत. यामध्ये वसई विरार महापालिका मुख्यालय, विरार पोलीस ठाणे आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक अशा महत्वाच्या ग्राहकांच्या बिलांचाही समावेश असल्यामुळे बिलांचे वाटप करणाऱ्या ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्थ येथील पंपावरून पेट्रोल भरून निघालेला एक रिक्षाचालक लघुशंकेसाठी गेला असता तिथे त्याला एका कचरा कुंडीत कागदाचा गठ्ठा सापडला.त्याने तो उघडून पाहिला असता, त्यात विजेची बिले आढळून आली.त्यामुळे त्याने ही बिले फेरीवाला संघाचे कार्यकर्ते एस.आर.खान यांच्याकडे आणून दिली. खान यांनी तपासणी केली असता, ही बिले १८ मे २०१६ असल्याची तसेच ती भरण्याची अंतिम मुदत १ जून असल्याचे स्पष्ट झाले.
ग्राहक क्रमांक 00१५ या सिरीजची ही एकूण १०२ बिले असून,त्यात वसई-विरार शहर महानगरपालिकेचे मुख्यालय, सुप्रिटेंडेंट आॅफ पोलीस म्हणजेच विरार पोलीस ठाणे आणि ठाणे जिल्हा को.आॅ.बँक अशा महत्वाच ग्राहकांचा समावेश आहे. ही बिले जोडून खान यांनी वीज वितरण कंपनीचे विरार येथील कार्यकारी अभियंता बा.भा. हळनोर यांना एक निवेदन दिले आहे. महत्वाची देयके अशाप्रकारे कचरा कुंडीत टाकणाऱ्या संबंधित ठेकेदार अथवा व्यक्तीची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी खान यांनी या निवेदनात केली आहे.
ग्राहकाना वीजेची बिले वाटण्याचे कंत्राट महावितरण खाजगी व्यक्ती किंंवा संस्थेला देते. त्यासाठी प्रत्येक बिलामागे ५० पैसे बटवडा चार्ज दिला जातो. प्रत्येक ग्राहकाच्या हाती त्याची देयके मुदतीत मिळण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा बोजवारा बिल वाटप करणाऱ्या ठेकेदाराकडून अथवा त्याने नेमलेल्या व्यक्तीकडून उडवला जात आहे.