देशातील मराठी अधिकारी, उद्योजक घडविणार ‘महाराष्ट्रातील युवा पिढी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:15+5:302021-02-24T04:41:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, यांच्या ...

देशातील मराठी अधिकारी, उद्योजक घडविणार ‘महाराष्ट्रातील युवा पिढी’
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत ‘आयएएस आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला’ हा उपक्रम १ मार्चपासून ३६५ दिवस दररोज एक तास या पद्धतीने ऑनलाइन राबविण्यात येणार आहे.
या माध्यमातून राज्यातील सर्व प्रशासकीय सेवेसाठीच्या आवश्यक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीतील सर्व मराठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची संस्था ‘पुढचं पाऊल’ ही सहकार्य करणार असून, महाराष्ट्रातील ‘सॅटर्डे क्लब’ हा उद्योजकांचा ग्रुप महाविद्यालयीन युवकांना उद्योजकीय कौशल्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि व्हॉईस क्लिनीक, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व शिक्षकांच्या आवाजाची काळजी घेण्यासाठी एक अभिनव उपक्रम ‘आवाज गुरुजनांचा-वेध देशाच्या भवितव्याचा’ या कार्यशाळांच्या माध्यमातून शिक्षकांसाठी राबविण्यात येणार आहेत. अशा पद्धतीचा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य ठरणार आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा ऑनलाइन शुभारंभ २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव विकास खारगे, शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण विभाग मुंबईचे संचालक अभय वाघ, पुढचे पाऊलचे अध्यक्ष प्रफुल्ल पाठक, सॅटर्डे क्लबचे संचालक संतोष पाटील व व्हाॅइस क्लिनिक, ठाणेच्या संचालिका सोनाली लोहार आदी उपस्थित राहणार आहेत.
आजपर्यंत राज्यामध्ये या योजनेंतर्गत ८०० पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये सदर कक्षासाठी समन्वयक नियुक्ती झालेली आहे व हजारो विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीदेखील केली आहे, तसेच शिक्षक नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित महाविद्यालयांमध्ये लवकरच हे कक्ष कार्यान्वित होतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.
उद्घाटन सोहळ्यात असे राहा उपस्थित
https://www.facebook.com/YWCKolhapur/
https://www.youtube.com/channel/UChvqVo1cE_PmXE19a4ye1gA या लिंकद्वारे ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.