ठाणे : दहावी आणि १२ वीचे निकाल लागले असून महाविद्यालय प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र, या प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले वाटप करणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. गेल्या दहा दिवसांपासून महाऑनलाईन पोर्टल हे संकेतस्थळ बंद असल्याने दाखले वाटप प्रक्रिया ठफ्प झाली आहे. मात्र,आपले सरकार- गतीमान सरकार असा दावा करणाऱया या शिंदे-फडणवीस सरकारला त्याच्याशी काहीही देणेघेणे नसून ते विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे ट्वीट द्वारे यांनी केला आहे. सध्या शैक्षणिक सत्र सुरु असून विविध ठिकाणी दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु महाऑनलाईन पोर्टल दिवसा पूर्णत: बंद असल्याने दाखल्यांची आवक वाढत आहे. परंतु, महाऑनलाईन पोर्टल बंद असल्याने दाखले मंजुरीकरीता पुढे पाठवता येत नाहीत. संकेतस्थळ अपडेट करण्याच्या नावाखाली हे संकेतस्थळच बंद असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विशेष म्हणजे संकेतस्थळ अपडेट करण्याचे काम दिवसा केले जात असल्याने रात्री काही काळासाठी हे संकतेस्थळ सुरु होते. मात्र, लागलीच ते बंद होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले, अधिवास आणि रहिवास दाखले मिळत नसून त्या अभावी महाविद्यालय प्रवेश रखडत आहे. अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या यादीनुसार प्रवेश घेण्याची मुदत सोमवारी संपली आहे. मात्र, दाखल्यांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेताच आला नसल्याचे दिसून आले आहे, असे परांजपे यांनी सांगितले. दरम्यान, शाळा तसेच महाविद्यालयीन प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांकडून विविध दाखल्यांची मागणी केली जात आहे. यामुळे विद्यार्थी तसेच पालकांना तहसिलदार कार्यालयामध्ये वारंवार फेऱया माराव्या लागत आहेत. विहीत मुदतीत दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शाळा तसेच महाविद्यालयीन प्रवेशासाठी अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी तसेच शैक्षणिक व इतर ज्या परीक्षा असतील त्यांच्यासाठी दाखले सादर करण्यासाठी ३ महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही आनंद परांजपे यांनी केली आहे.
महाऑनलाईन पोर्टल दहा दिवसांपासून बंद; तथाकथीत आपले सरकारचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ - आनंद परांजपे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 19:14 IST