-सदानंद नाईक, उल्हासनगर उल्हासनगर शहर पश्चिममध्ये राहणाऱ्या ११ वर्षाच्या मुलीवर वडिलांकडूनच अत्याचार केले जात असल्याची एक संतापजनक घटना समोर आली. वासनांध बापाचे हे कृत्य वर्गशिक्षिकेच्या सतर्कतेमुळे उघड झाले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगरातील एका शाळेत मुलांना बॅड व गुड टचच्या बाबत माहिती दिली गेली. त्यानंतर ११ वर्षाच्या मुलीने वर्गशिक्षकेकडे जाऊन वडील तिच्या सोबत करीत असलेल्या कृत्याची माहिती दिली.
आई राहते दुसरीकडे, मुलींचा ताबा बापाकडे
शिक्षिकेला याप्रकाराने धक्का बसला. शिक्षिकेने मुलीच्या आईला बोलावून मुलीने सांगितलेला सर्व प्रकाराची माहिती दिली. मुलीचे आई व वडील गेल्या काही वर्षापासून विभक्त राहत असून दोन्ही मुलींचा ताबा वडिलांकडे आहे.
मोठी मुलगी ११ वर्षाची असून वडील तिच्यावर अत्याचार करीत असल्याचे उघड झाले. मुलीच्या आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर, पोलिसांनी वडिला विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. मुलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.