एक सच्चा कार्यकर्ता गमावला - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:07 IST2020-09-24T01:07:34+5:302020-09-24T01:07:52+5:30
राजेंद्र देवळेकर यांना वाहिली श्रद्धांजली

एक सच्चा कार्यकर्ता गमावला - उद्धव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीचे माजी महापौर व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच समाजातील विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
‘राजेंद्र देवळेकर यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. धडाडीचे शिवसैनिक, अशी ओळख असणारे देवळेकर या कोरोनाकाळातही अनेकांच्या मदतीला धावून गेले होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विकास वाटचालीत त्यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा कार्यकर्ता, मनमिळाऊ लोकप्रतिनिधी गमावला आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
देवळेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीतील नेते व नगरसेवक राजेंद्र देवळेकर हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. सामाजिक कार्याला वाहून घेतलेले कार्यशील, अभ्यासू व्यक्तिमत्त्व अकाली काळाच्या पडद्याआड गेले आहे. कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना त्यांची उणीव सतत जाणवेल. या दु:खातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना व सहकारी कार्यकर्त्यांना मिळो, ही प्रार्थना.
- अजित पवार,
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
के डीएमसीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या निधनामुळे कल्याणमधील शिवसेना परिवारात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. जनसेवेकरिता सदैव तत्पर, सुस्वभावी, मनमिळाऊ देवळेकर आज आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो. तसेच देवळेकर कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती प्रदान करो.
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे
राजेंद्र देवळेकर यांचे निधन झाल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. अत्यंत सुस्वभावी, मनमिळाऊ तसेच मदतीसाठी तत्पर असलेल्या देवळेकर यांच्या जाण्याने शिवसेनेच्या कल्याण-डोंबिवली विभागाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो. भावपूर्ण श्रद्धांजली. - डॉ. श्रीकांत शिंदे,
खासदार कल्याण लोकसभा
महापालिका कायद्याचे उत्तम ज्ञान असलेले, चांगले व्यक्तिमत्त्व देवळेकरांच्या निधनाने आपण गमावले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना देवळेकर हे एक चांगले प्रशासक असल्याचेही त्यांच्या कामातून पाहायला मिळाले. १९९५ पासून नगरसेवक असलेल्या देवळेकरांचे काम महापालिका सचिव म्हणून जवळून पाहता आणि अनुभवता आले. - चंद्रकांत माने, माजी सचिव
देवळेकर केडीएमसीचे ज्येष्ठ सदस्य राहिले. अभ्यासू आणि कर्तृत्ववान असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची अडीच वर्षांची महापौरपदाची कारकीर्दही त्यांनी यशस्वीरीत्या निभावली होती. त्यांच्या निधनाने शिवसेना पक्षाची हानी झाली आहेच. त्याचबरोबर महापालिकेचेही नुकसान झाले आहे.
- विनीता राणे, महापौर, केडीएमसी
सभापतीपद आणि महापौरपद भूषविताना देवळेकरांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना समान न्याय दिला होता. अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सभागृहात चर्चेच्या वेळी याची प्रचीती वारंवार यायची. असा लोकप्रतिनिधी पुन्हा होणे नाही.
- नंदू म्हात्रे, काँग्रेस, माजी गटनेते, केडीएमसी
माजी महापौर, माजी स्थायी समिती सभापती, अशी महत्त्वाची पदे भूषवलेले माझे मित्र, कट्टर शिवसैनिक व अतिशय अभ्यासू नगरसेवक म्हणजे राजेंद्र देवळेकर. समोरासमोर भेटले तर सुहास्यवदने आणि मृदू भाषेत बोलणारे देवळेकर महापालिकेच्या सभागृहात आक्रमक शैलीत अभ्यासपूर्ण विवेचन करून प्रशासनाची पोलखोल करत. केडीएमसीतील विशेषत: कल्याणच्या नागरी समस्यांचा जाणकार म्हणून त्यांची ख्याती होती. महापौरपदाच्या माध्यमातून कल्याणच्या विकासासाठी आपली कटिबद्धता जपली, हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
- रवींद्र चव्हाण,
आमदार, डोंबिवली
राजकारणापलीकडे जाऊन मैत्रीसंबंध जोपासणारे, मनमिळाऊ, लाडके असे व्यक्तिमत्त्व राजेंद्र देवळेकर आज आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. जनसेवेकरिता सदैव ते तत्पर असायचे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो तसेच देवळेकर कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती प्रदान करो.- प्रमोद पाटील, आमदार