हरवलेली पैशांची बॅग सापडली; रेल्वे, पोलिसांची तत्परता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:41 IST2019-12-30T00:41:28+5:302019-12-30T00:41:36+5:30
आईच्या उपचाराचे पैसे मिळाले परत

हरवलेली पैशांची बॅग सापडली; रेल्वे, पोलिसांची तत्परता
ठाणे : आजारी असलेल्या आईच्या उपचारासाठी नाशिक येथील नातेवाइकांकडून आणलेले ६६ हजार ५०० रुपये ज्या बॅगेत ठेवले होते, तीच बॅग लोकलमध्ये राहिल्याने रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील रहिवासी माधवी रमेश सोष्टे (३५) यांच्या डोळ्यांसमोर अंधेरीच आली होती. मात्र, रेल्वे प्रशासन आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत बॅग पैशांसह परत मिळाल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. माधवी यांनी रेल्वे प्रशासन आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत.
सोष्टे या नाशिकहून रविवारी दुपारच्या सुमारास एक्स्प्रेसने ठाण्यात उतरल्या. त्यानंतर, त्या ठाण्यातून पनवेल येथे जाण्यासाठी ठाणे-नेरूळ लोकलमध्ये बसल्या. यावेळी त्यांच्या दोन बॅगा असल्याने त्यांनी एक बॅग लोकलमधील रॅकवर ठेवली. नेरूळ आल्यावर सोष्टे या घाईगडबडीत एक बॅग घेऊन उतरल्या आणि एक बॅग लोकलमध्येच राहिली. त्यानंतर, ती लोकल पुन्हा ठाण्याकडे रवाना झाली. थोड्या वेळानंतर त्यांना एक बॅग लोकलमध्ये राहिल्याचे लक्षात येताच, त्यांनी रेल्वेच्या कंट्रोलमध्ये तक्रार केली. कंट्रोल रूमकडून त्याबाबत ठाणे लोहमार्ग पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस नाईक मोहन जाधव आणि पोलीस शिपाई प्रभाकर नाटेकर हे दोघे स्थानकावर ड्युटी करीत होते. त्यांना माहिती मिळताच, त्यांनी तातडीने धाव घेत, ती लोकल आल्यावर त्या डब्याची तपासणी केली. तेव्हा त्यांना लोकलमध्ये बॅग आढळून आली. सोष्टे यांना पोलिसांनी रेल्वेस्थानकात बोलवले. सोष्टे यांना शांत राहण्यास सांगून पिण्यास पाणी दिले.त्यांनी बॅगेची खातरजमा करून ती बॅग त्यांच्या स्वाधीन केली. त्या बॅगेत त्यांनी नाशिक येथील नातेवाइकांकडून आईच्या औषधोपचारासाठी आणलेले ६६ हजार ५०० रुपये, औषधे, आधारकार्ड, एटीएमकार्ड, हॉस्पिटलची महत्त्वाची कागदपत्रे होती.