लांब पल्ल्यांच्या गाड्या शॉर्टरूटवर रिकाम्या, पुढे मात्र प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST2021-09-17T04:47:25+5:302021-09-17T04:47:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : रेल्वेला जनरल डबे सध्या नसल्याने आरक्षित डब्यातच प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यातही जे जनरलचे ...

लांब पल्ल्यांच्या गाड्या शॉर्टरूटवर रिकाम्या, पुढे मात्र प्रचंड गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रेल्वेला जनरल डबे सध्या नसल्याने आरक्षित डब्यातच प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यातही जे जनरलचे डबे होते, तेदेखील आरक्षित केले आहेत. त्यामुळे मुंबईमधून दादर, एलटीटी स्थानकातून सुटणाऱ्या लांबपल्याच्या गाड्या ठाणे, कल्याण, नाशिक, पुण्यापर्यंत तुलनेने कमी भरलेल्या असतात. मात्र, त्यानंतरच्या प्रवासात मात्र त्या आरक्षित असल्याने भरतात. मुंबईतून उत्तरेकडे- दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या या भरलेल्या असतात. परंतु, शॉर्टरूटवर सुटणाऱ्या गाड्या मात्र भरलेल्या दिसून येत नाहीत. त्यामुळे पुणे, नाशिक, मनमाडपर्यंत तिकीट मिळत आहे. त्यानंतरच्या प्रवासात नागपूर, तसेच दुसरीकडे सोलापूर मार्गांवर तिकीट मिळवताना प्रवाशी वेटिंगवर असल्याचे दिसून येते. परंतु, प्रवासाची तारीख येईस्तोवर ते कन्फर्म होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
--/-------------------
विक्रेत्यांची अजून तरी गर्दी नाही
मुंबईतून गाडी सुटली की ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, पुणे, लोणावळा स्थानकात गाडी थांबली की काही प्रमाणात विक्रेते खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणतात. प्रत्यक्षात मात्र प्रवासात अद्यापही फारशा पॅन्ट्रिकार उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मागणी असली तरी विक्रेत्यांनी सुरुवात मात्र केली नसल्याचे निदर्शनास येत आहे.
---------------------
सर्व गाड्यांत स्थिती सारखीच
ठाणे, कल्याण स्थानकातून ये-जा करणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांची पाहणी केली असता इथे तरी तुलनेने गाड्यांना गर्दी कमी असल्याचे जाणवले. मुळात एलटीटी, दादर, सीएसएमटी येथून सुटणाऱ्या गाड्या जेव्हा ठाणे, कल्याणमध्ये येतात. त्यावेळी अवघे ४० ते ५० किमी अंतर असल्याने गणेशोत्सवाला डब्यात सध्या तरी गर्दी दिसून आलेली नाही. कोकणात जाणाऱ्या गाड्या मात्र तुलनेने जास्तच फुल्ल असल्याचे जाणवले.
---------------
मुंबई येथून सुटणारी नागपूर सेवाग्राम ही गाडी रविवारी कल्याण स्थानकात दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आली असता त्या गाडीत आरक्षित प्रवासी बसले होते. त्यातही कल्याण ते नाशिकपर्यंतच्या प्रवासात गर्दी नसल्याने प्रवासी समाधानी होते. तसेच हावडा मेल ही गाडी मंगळवारी रात्री नाशिक ते कल्याण मार्गावर येताना ती तुलनेने बिफोर टाईम आल्याचे निदर्शनास आले. त्या गाडीत आरक्षित जागा फुल्ल होत्या, त्यापेक्षा मात्र जास्त गर्दी दिसली नाही. कोकणात जाणाऱ्या गाड्या तुलनेने फुल्ल होत्या.
-------------
कोविडच्या निर्बंधकाळात ज्या गाड्या विशेष म्हणून सोडल्या आहेत त्यामध्ये जनरलसाठी लागणारे डबेदेखील गर्दी होऊ नये यासाठी आरक्षित केले आहेत. ते आता पुन्हा जनरलचे कधी होणार हा रेल्वे बोर्ड, मंत्रालय, राज्य शासन यांच्यातील पॉलिसी मॅटर असल्याने आम्ही यावर भाष्य करू शकत नाही. जशी मार्गदर्शक तत्त्व येतील त्यानुसार कार्यवाही निश्चितपणे करण्यात येईल.
- जनसंपर्क विभागातील अधिकारी, मध्य रेल्वे.
-------------------------------