ब्रेन डेड तरुणाचे चौघांना जीवदान
By Admin | Updated: November 16, 2016 04:29 IST2016-11-16T04:29:13+5:302016-11-16T04:29:13+5:30
बदलापूरच्या एका ब्रेन डेड रुग्णाचे हदय, दोन किडन्या आणि यकृत हे वेगवेगळ्या चार रुग्णांना दान करण्यात आल्याने त्यांना जीवदान

ब्रेन डेड तरुणाचे चौघांना जीवदान
ठाणे : बदलापूरच्या एका ब्रेन डेड रुग्णाचे हदय, दोन किडन्या आणि यकृत हे वेगवेगळ्या चार रुग्णांना दान करण्यात आल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. या चारही रुग्णांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे आणि मुंबई पोलिसांनी एकत्रित समन्वयातून ग्रीन कॉरिडॉर तयार करुन ठाण्याच्या रुग्णालयातून मुलुंडच्या रुग्णालयात अवघ्या नऊ मिनिटांमध्ये हे हृदय पोहचविले. उल्लेखनीय म्हणजे या कुटुंबातील दुसऱ्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला, पण अशा परिस्थितीत खचून न जाता या कुटुंबाने अवयवदान करून समाजापुढे नवा आदर्श घालून दिला.
बदलापूरच्या रॉबिन डिसूझा (२१) याला ३ नोव्हेंबरला अपघात झाला होता. तेव्हापासून तो ब्रेन डेड अवस्थेत ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत होता. तीन वर्षांपूर्वी त्याच्याच १९ वर्षीय भावाचाही अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी अवयवदानाविषयीची नीटशी माहिती नसल्यामुळे डिसूझा कुटूंबियांना त्याचे अवयवदान करता आले नव्हते. त्यामुळेच रॉबिनच्या अवयवदानाचा त्यांनी तत्काळ निर्णय घेतला. त्यानुसार त्याचे हदय मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात, एक मूत्रपिंड मरिन लाईन्सच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तर यकृत आणि दुसरे मूत्रपिंड ज्युपिटरमधील दोन वेगवेगळ्या रुग्णांना दान केले.
असा झाला ग्रीन कॅरिडोर...
रॉबिनचे हृदय फोर्टीसला तर मुत्रपिंड बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ग्रीन कॉरिडोरची आवश्यकता असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने ठाण्याच्या वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांना सकाळी ८.३० वा. दिली. त्यानुसार दुपारी १.४५ वा. हृदय घेऊन निघालेली रुग्णवाहिका अवघ्या साडे आठ ते नऊ मिनिटांमध्ये पाच किमी.चे अंतर पार करुन मुलुंडला पोहचली. त्यानंतर २७ मिनिटांमध्ये ४० किलोमीटरचा प्रवास करुन मरिन लाईन्स येथे पोहचली. बॉम्बे आणि फोर्टीस या दोन्ही रुग्णालयात ज्यांना हृदय आणि किडनी देण्याचे जाहीर झाले. त्या दोन वेगवेगळया रुग्णांवर शस्त्रक्रियेद्वारे त्यांचे रोपणही केल्याची माहिती ज्युपिटरमधील ज्येष्ठ हदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)