हे जीवन सुंदर आहे... हसा, खेळा आणि मजेत रहा
By Admin | Updated: February 6, 2017 04:13 IST2017-02-06T04:13:42+5:302017-02-06T04:13:42+5:30
आयुष्य खूप सुंदर आहे. ते केवळ परीक्षेच्या गुणांत-मार्कांत बंद करू नका.

हे जीवन सुंदर आहे... हसा, खेळा आणि मजेत रहा
प्रज्ञा म्हात्रे , पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)
आयुष्य खूप सुंदर आहे. ते केवळ परीक्षेच्या गुणांत-मार्कांत बंद करू नका. आयुष्यापेक्षा परीक्षेचे गुण महत्त्वाचे नाहीत. सचिन तेंडुलकर बारावी नापास आहे, पण आज तो भारतरत्न आहे. तुम्ही माणूस म्हणून चांगले की वाईट, हे शाळेची परीक्षा ठरवत नाही... अभिनेते सुबोध भावे यांनी युवकांना सल्ला देत होते आणि त्यांच्या साथीने सुरू होता युवा प्रतिभेचा शोध.
निमित्त होते, साहित्य संमेलनातील शं.ना. नवरे सभामंडपात ‘शोध युवा प्रतिभेचा’ अर्थात ‘आम्हाला काही सांगायचंय’ या चर्चासत्राचे.
साहित्य संमेलन, नाट्य संमेलन म्हटले की, सर्वाधिक संख्येने असते ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने या साहित्य संमेलनातील हा समज खोटा ठरवला. मराठी भाषा, साहित्य पुढे नेण्यासाठी आजची युवा पिढी सक्षम आहे आणि ते मराठी भाषेला नक्कीच चांगल्या ठिकाणी नेतील, असा विश्वास देत सुबोध भावे यांनी सहज संवाद साधला. इथे तुमची वार्षिक परीक्षा नाही, असा दिलासा देत त्यांनी युवा प्रतिभा फुलवण्यास मदत केली. साहित्य, शब्द म्हणजे आनंदोत्सव. त्यात परीक्षा नसते. साहित्य माणूसपण शोधायला शिकवते. ते कधी कोणाला कमी लेखत नाही. इतरांची भाषा आपण समजून घेऊ, तेव्हा तेही आपली मराठी आत्मसात करतील, असे त्यांनी सुचवले.
तेव्हा खरे टिळक कळले!
‘लोकमान्य टिळक’ चित्रपट करताना जेव्हा त्यांच्यावरील पुस्तकांचे वाचन केले, तेव्हा लक्षात आले शाळेत असताना आपल्याला टिळक किती शिकवले ते! शाळेतील विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रीय पुरुषांची किती किंमत असते? फक्त दोन मार्कांची. जोड्या लावा आणि गाळलेल्या जागा भरा. ती व्यक्ती आपल्याला शाळेत शिकवण्याचा प्रयत्न करीत नाही किंवा आपणही त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.
दरी निर्माण करणाऱ्यांचा निषेध
आजूबाजूला दहशतवादी बनवणारे साहित्य खूप आहे, पण आपल्याला माणूस बनवणारे साहित्य शोधायचे आहे. गटातटांचे राजकारण सुरू असले, तरी नाटक माणसाच्या चारही बाजू समोर आणते. माणसात दरी निर्माण करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो. साहित्याने मला माणसावर टीका करायला नव्हे, राष्ट्रपुरुषांवर, देशावर प्रेम करायला शिकवले, अशी भूमिका भावे यांनी मांडली.
सहभागी युवकांनी या वेळी मराठी भाषेविषयीचे प्रेम मांडले. आपण नेहमी आईच्या कविता वाचतो, पण कवितांत वडील हरवलेले असतात, अशी खंत एका विद्यार्थ्याने मांडली. चित्रपटांत आईची भूूमिका चांगली, पण वडिलांची नकारात्मक असते. ते कधी मारझोड करणारे, तर कधी बायकोचा गुलाम असतात. साहित्यात वडिलांनाही महत्त्व हवे, असे मत त्याने मांडले. निकिता टेंबे या विद्यार्थिनीने इंटरनेट या विषयावर कविता सादर केली.
सागर महाजन याने साहित्याकडील तरुणाईच्या दुर्लक्षावर प्रकाश टाकला. भावे यांच्या हस्ते ‘हार्मोनिअम’ आणि ‘घेई छंद’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. या वेळी नेहा वैशंपायन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. के.वि. पेंढरकर, आदर्श, मॉडेल, साउथ इंडियन, के.एम. अग्रवाल, वंदे मातरम्, प्रगती, ग्लोबल, मंजुनाथ, बिर्ला, स्वयंसिद्धी या महाविद्यालयांतील युवकयुवतींचा यात सहभाग होता.