आधुनिक भारतात ग्रंथालये ही शक्ती केंद्रे
By Admin | Updated: February 23, 2015 00:20 IST2015-02-22T22:44:19+5:302015-02-23T00:20:41+5:30
संजय केळकर : चिपळुणात माहिती कोश स्मरण ग्रंथाचे प्रकाशन

आधुनिक भारतात ग्रंथालये ही शक्ती केंद्रे
चिपळूण : आधुनिक भारतात ग्रंथालये ही शक्ती केंद्र आहेत. या शक्तिस्थानांचे जतन व संवर्धन करण्यासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी येथे केले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरतर्फे महाराष्ट्रातील शतायु ग्रंथालयाच्या माहिती कोश स्मरण ग्रंथाचे प्रकाशन आमदार केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सावित्री होमकळस, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, ग्रंथालयाचे अध्यक्ष अरविंद जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, केदार साठे, गंगाराम इदाते, रमेश चिपळूणकर, नगरसेविका माधुरी पोटे, सरोज नेने, शरद दंडवते, प्राची जोशी, अविनाश पोंक्षे, सुमेध करमरकर, विजय बागवे, शिवाजी शिंदे, महमद घारे, अरुण इंगवले आदींसह ग्रंथालयाचे संचालक उपस्थित होते. आमदार केळकर यांनी चिपळूणच्या ग्रंथालयाशी आपले असलेले नाते उलगडून सांगताना पदवीधर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या ग्रंथालयाला अनेकवेळा भेट दिली. आजोबा कवी आनंद यांच्या साहित्याचे संकलन करुन अरुण इंगवले यांनी प्रकाशित केलेल्या आनंदाचे डोही या पुस्तकाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या स्मृतीला उजाळा देताना आमदारकीच्या काळात कोकणातील अगदी लहान गावातील शाळा आणि ग्रंथालयांना भेटी देऊन अर्थसहाय्य देण्याचे भाग्य लाभले. ग्रंथालयासंदर्भातील मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार असल्याचेही केळकर यांनी सांगितले. प्रास्ताविकामध्ये प्रकाश देशपांडे यांनी ग्रंथालयाच्या स्थापनेपासूनचा इतिहास स्पष्ट करुन चिपळूण नगर परिषदेने दिलेल्या सहकार्यानेच आजवरची वाटचाल केली असल्याचे सांगून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे समस्त चिपळूणकरांचे यश आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य केल्यामुळेच संमेलन यशस्वी झाले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने हे शिवधनुष्य कोकणवासीयांच्या बळावरच पेलले. ग्रंथालयांची शताब्दी होते, पण आपल्या ग्रंथालयाने संपूर्ण महाराष्ट्रातील शतायु ग्रंथालयांची माहिती एकत्र करुन कोश करण्याचे वेगळेच काम केले आहे. या स्मरण ग्रंथाचे संपादन अंजली बर्वे यांनी केले असून यामध्ये अरुण इंगवले, अभिजीत देशमाने यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. अजूनही काही ग्रंथालयांनी माहिती पाठवली नाही, अशी खंत व्यक्त करुन कोशाचे काम हे अखंड चालणारे असते. त्यामुळे या कामात ग्रंथालयांना सहकार्य करताना आनंदच वाटेल, असे देशपांडे यांनी सांगितले.
नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला आजपर्यंत जसे सहकार्य केले आहे तसेच यापुढे नगर परिषद करेल, असे आश्वासन दिले. गं्रथालयाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या हस्ते आमदार केळकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रारंभी गोविंद पानसरे यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन मधुसुदन केतकर यांनी केले. (वार्ताहर)
आमदारकीच्या काळात कोकणातील लहान गावातील शाळा-ग्रंथालयांना अर्थसहाय्य देण्याचे भाग्य लाभले: केळकर.
टिळक वाचन मंदिराने कोकणवासियांच्या बळावर शिवधनुष्य पेलले : देशपांडे.
ंटिळक स्मारक वाचन मंदिरतर्फे महाराष्ट्रातील शतायू ग्रंथालयाच्या माहिती कोश स्मरण ग्रंथाचे प्रकाशन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सावित्री होमकळस, प्रकाश देशपांडे, अरविंद जाधव उपस्थित होते.