सावरकर संमेलनाकडे तरुणांची पाठ

By Admin | Updated: April 25, 2017 00:06 IST2017-04-25T00:06:46+5:302017-04-25T00:06:46+5:30

शहरात झालेल्या एकोणतिसाव्या अ.भा. सावरकर साहित्य संमेलनाकडे आयोजकांच्या उदासीनतेमुळे तरुणांनी पाठ फिरवल्याचे दिसले.

Lessons of youth to the Savarkar convention | सावरकर संमेलनाकडे तरुणांची पाठ

सावरकर संमेलनाकडे तरुणांची पाठ

ठाणे : शहरात झालेल्या एकोणतिसाव्या अ.भा. सावरकर साहित्य संमेलनाकडे आयोजकांच्या उदासीनतेमुळे तरुणांनी पाठ फिरवल्याचे दिसले. गडकरी रंगायतन येथे चाललेल्या या तीनदिवसीय संमेलनात केवळ ज्येष्ठ नागरिकांचीच उपस्थिती होती. तरुणांचा सहभाग नगण्य असल्याचे चित्र तीन दिवस पाहायला मिळाले.
२१ ते २३ एप्रिलदरम्यान हे संमेलन झाले. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात तरुणांची गर्दी खेचून आणण्यास आयोजक पुरते अपयशी ठरले. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या शहरात विविध साहित्य संमेलने पार पडली आहेत. या संमेलनांना तरुणांची बऱ्या प्रमाणात उपस्थिती होती. मात्र, सावरकर संमेलनात ती नव्हती. या संमेलनाला उपस्थित असलेला वर्ग पाहून हे संमेलन केवळ ज्येष्ठांचेच होते का, असा प्रश्न सांस्कृतिक वर्तुळातून उपस्थित होत आहे. तरुणांचा सहभाग अधिकाधिक असावा, यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करा, आपल्या घरातील मुलांना संमेलनात सहभागी करा, असे आवाहन आयोजकांनी संमेलनपूर्व बैठकीत केले होते. परंतु, या आवाहनाला तरुणांचा प्रतिसाद मिळालाच नाही. तसेच, या संमेलनात जास्तीतजास्त तरुण सहभागी होतील, त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यासाठी १४ते २० एप्रिलदरम्यान संमेलनपूर्व कार्यक्रमही राबवण्यात आले. परंतु, मुख्य संमेलन असो वा संमेलनपूर्व कार्यक्रम, यात तरुणांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह होते. तरुणांची गर्दी खेचण्यासाठी शाळा, महाविद्यालयांत जागृती होणे गरजेचे होते. मात्र, तेथे आयोजक पोहोचलेच नसल्याने त्यांनाही या संमेलनाची माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सावरकरांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याच्या आयोजकांच्या उद्देशालाच कात्री लागली.
शुक्रवारी काढलेल्या ग्रंथदिंडीतही तरुणांनी पाठ फिरवली होती. त्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. परिसंवाद, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रमांत
तरुणाई सहभागी होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, ज्येष्ठ नागरिकच तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले. काही तर कार्यक्रमाच्या अधूनमधून वामकुक्षी घेताना दिसले.
भारताची संरक्षणसिद्धता, सावरकर आजच्यासंदर्भात, सावरकरांचे साहित्यविश्व, महाकवी सावरकर, महाराष्ट्रदर्शन, भारतातल्या समाजसुधारणा- विविध प्रयत्न, सावकरांवरील आक्षेप व निराकरण, अल्पज्ञात सावरकर हे कार्यक्रम
तरु णाईला प्रेरणा मिळावी, याउद्देशाने आयोजित केले होते. ग्रंथदालनालाही तरुणांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शहरातही या संमेलनाविषयी जागृती न झाल्याने ना विद्यार्थी, ना तरुण ना मध्यमवयातील वर्ग येथे होता. ‘हे संमेलन तरुणांना वाव देण्यासाठी होते. सावरकरांच्या विचारांचा प्रचारप्रसार तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांना सहभागी करून घेतले’ असे समारोप सोहळ्याच्या दिवशी व्यासपीठावरून सांगणारे आयोजक तरुणवर्ग उपस्थित नसताना कोणत्या तरुणांना उद्देशून बोलत होते, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Lessons of youth to the Savarkar convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.