ठाकरेबंधूंची संमेलनाकडे पाठ
By Admin | Updated: February 6, 2017 04:42 IST2017-02-06T04:42:52+5:302017-02-06T04:42:52+5:30
मराठी भाषाभिमानाचे आणि मराठी माणसाच्या अस्मितेचे आम्हीच ठेकेदार असल्याचा दावा करणारे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण

ठाकरेबंधूंची संमेलनाकडे पाठ
पु.भा. भावे साहित्यनगरी, (डोंबिवली) : मराठी भाषाभिमानाचे आणि मराठी माणसाच्या अस्मितेचे आम्हीच ठेकेदार असल्याचा दावा करणारे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाकडे चक्क पाठ फिरवली. राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने हे दोघे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. भाजपाच्या नेत्यांनी नेमकी हीच संधी साधत संमेलन हायजॅक केले.
मराठी भाषा आणि मराठी माणसाचे राजकारण हा शिवसेना व मनसेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते, तर संमेलनाच्या समारोप सत्राला उद्धव ठाकरे यांना हजर राहण्याचे निमंत्रण दिले होते. दोघांनीही कार्यक्रमांना दांडी मारली. राज्यात महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असून शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागले आहे, तर मनसे अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्यामुळे ठाकरेबंधूंनी संमेलनाला येण्याचे टाळले. युती तुटल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांसोबत व्यासपीठावर एकत्र येण्याचे टाळले असले, तरी संमेलनाचे व्यासपीठ हे बिगर राजकीय आहे. राजकारणातील मतभेद व्यक्त करण्याचे हे ठिकाण नाही, असे मत एका साहित्यिकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केले. नेमकी हीच संधी साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी अनुक्रमे उद्घाटन व समारोप कार्यक्रमाला हजेरी लावून भाजपाचा संमेलनावरील वरचष्मा सिद्ध केला.
उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीपेक्षा जास्त खटकली, ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गैरहजेरी. डोंबिवलीमधील हे संमेलन भाजपाने हायजॅक केल्याची ओरड शिवसेना सुरुवातीपासून करत होती. मात्र, जेव्हा हजर राहून हे संमेलन केवळ भाजपाने आपल्याकडे खेचलेले नाही, हे दाखवून देण्याची संधी आली, तेव्हा शिंदे हजर राहिले नाहीत. शिंदे हे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याचे कारण शिवसैनिक देत होते. मात्र, त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही संमेलनाकडे दुर्लक्ष केले. डोंबिवलीतील शिवसेनेची संमेलनाबाबत अनास्था एवढी भीषण होती की, मातब्बर साहित्यिक, रसिक व हजारो विद्यार्थी ग्रंथदिंडी घेऊन निघाले, तेव्हा शिवसेना शाखेपाशी ग्रंथदिंडीचे स्वागत करायलाही कुणी हजर नव्हते. एकदोन शिवसैनिकांनी तर आम्ही मराठीप्रेमी असल्याचे सांगायला लाज वाटते, इतकी उदासीनता आमच्या पक्षाने संमेलनाबाबत दाखवली, असे खासगीत कबूल केले. (विशेष प्रतिनिधी)