कुष्ठरुग्णांच्या दवाखान्याची पडझड; केडीएमसी शाळेच्या सभागृहातच केले जातात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:09 IST2019-06-03T00:09:46+5:302019-06-03T00:09:59+5:30
कुष्ठरुग्णांवर उपचार व्हायचे, पण २५ वर्षे ज्याठिकाणी उपचार सुरू होते, त्या दवाखान्याची आता जीर्ण अवस्थेमुळे पुरती पडझड झाली आहे.

कुष्ठरुग्णांच्या दवाखान्याची पडझड; केडीएमसी शाळेच्या सभागृहातच केले जातात उपचार
कल्याण : कचोरे परिसरातील हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये असलेल्या दवाखान्याच्या वास्तूची जीर्ण अवस्थेमुळे पडझड झाल्याने जागेअभावी फेब्रुवारीपासून बाजूकडील शाळेलगतच्या सभागृहात कुष्ठरुग्णांवर उपचार केले जात आहेत. चार महिने उलटूनही कोसळलेल्या दवाखान्याची दुरुस्ती करण्यासाठी केडीएमसीला मुहूर्त मिळालेला नाही.
हनुमाननगर वसाहतीत कुष्ठरुग्णांची १६० कुटुंबे वास्तव्याला आहेत. यातील काही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या येथील १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५९ रुग्णांमध्ये दिव्यांगांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. अशा कुष्ठरुग्णांना दररोज मलमपट्टी करावी लागते. अन्यथा, रुग्णांच्या जखमांमधून बाहेर पडणाऱ्या जंतंूमुळे रोगाचा फैलाव होऊ शकतो. कुष्ठरुग्णांची वाढती संख्या पाहता केडीएमसीने १९९३ मध्ये याठिकाणी स्वतंत्र दवाखाना उभारला. या दवाखान्याची पडझड होऊ न दुरवस्था झाली आहे.
कुष्ठरुग्णांवर उपचार व्हायचे, पण २५ वर्षे ज्याठिकाणी उपचार सुरू होते, त्या दवाखान्याची आता जीर्ण अवस्थेमुळे पुरती पडझड झाली आहे. त्याची त्वरित डागडुजी करणे गरजेचे आहे. अतिधोकादायक अवस्थेतील या दवाखान्याचा कधीही स्लॅब कोसळून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे फेब्रुवारीपासून हा दवाखाना जवळच असलेल्या केडीएमसीच्या राजगुरू विद्यालयाच्या सभागृहात हलवण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्या दवाखान्याची इमारत दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे या इमारतीचा एखादा भाग कोसळून पादचारी किंवा रुग्ण जखमी होण्याचा धोकाही कायम आहे. जानेवारीतील शेवटच्या आठवड्यापासून हा दवाखाना धोकादायक स्थितीत असून केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्याही हे लक्षात आणून देण्यात आले. तेव्हा त्यांनी संबंधित विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप काहीच कारवाई झालेली नाही.
दवाखान्याची वास्तू मोडकळीस आली आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी आराखडा तयार करून संबंधित प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच कृती होईल. - डॉ. राजू लवंगारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, केडीएमसी
राज्यमंत्र्यांचे पत्र
दवाखान्याची पडझड झाली, तेव्हा केडीएमसीसह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही पत्र लिहून डागडुजी करण्यास आयुक्तांना पत्र द्यावे, अशी विनंती हनुमाननगर कुष्ठसेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केली होती. त्यावर चव्हाण यांनी आयुक्तांना ६ फेब्रुवारीला पत्र पाठवून काम तातडीने करण्याबाबत आदेशही दिले. पण, आजवर कोणतीही कृती महापालिकेकडून झालेली नाही.