शिक्षितांचाही टॅक्सी चालवण्याकडे ओढा
By Admin | Updated: September 21, 2014 00:46 IST2014-09-21T00:46:25+5:302014-09-21T00:46:25+5:30
आठवी आणि दहावी उत्तीर्ण झालेल्यांना प्राधान्य देत त्यांच्यासाठी बाद झालेले टॅक्सी परवाने नव्याने नूतनीकरण करून वाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला.

शिक्षितांचाही टॅक्सी चालवण्याकडे ओढा
परवान्यांसाठी 31 हजार 483 अर्ज : बारावी आणि पदवीधारकांनीही केले अर्ज
मुंबई : आठवी आणि दहावी उत्तीर्ण झालेल्यांना प्राधान्य देत त्यांच्यासाठी बाद झालेले टॅक्सी परवाने नव्याने नूतनीकरण करून वाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. मात्र या परवान्यांसाठी बारावीसह डिप्लोमा आणि ग्रॅज्युएटधारकांनीही अर्ज केल्याने याकडे शिक्षितांचा ओढा लागल्याचेही समोर आले आहे. टॅक्सी परवान्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपली. या परवान्यांसाठी एकूण 31 हजार 483 अर्ज आले असून, यात शिक्षितांचेही बरेच अर्ज आले आहेत.
टॅक्सीच्या बाद झालेल्या परवान्यांचे परिवहन विभागाकडून नव्याने नूतनीकरण करून वाटप करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. असे जवळपास 15 हजार बाद टॅक्सी परवाने असून, यातील 7 हजार 843 परवान्यांचे मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण क्षेत्रत नव्याने वाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला.
यासाठी 6 ते 20 सप्टेंबर्पयत ऑनलाइन अर्ज सेवा उपलब्ध करण्यात आली होती. शेवटची मुदत संपल्यानंतर परिवहन विभागाकडे एमएमआरटीए क्षेत्रतून 31 हजार 483 अर्ज आले आहेत.
दहावी पास असलेल्या अर्जधारकांना यात प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यानंतर आठवी पास अर्जधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे. आलेल्या अर्जामध्ये आठवी पासचे 14 हजार 10, तर दहावी पासचे 8 हजार 418 अर्ज आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे बारावी पास असलेले 3 हजार 534 अर्ज आल्याचे सांगण्यात आले. डिप्लोमा असलेल्या 45 जणांनी तर ग्रॅज्युएट झालेल्या 1 हजार 57 जणांनी या परवान्यांसाठी अर्ज केले आहेत. (प्रतिनिधी)
शनिवार्पयत फक्त 27 हजार 64 जणांनी देयके भरली होती. ऑनलाइन देयक भरण्याची सुविधा 22 सप्टेंबर्पयत उपलब्ध असून, उर्वरित अर्जधारक या दिवसार्पयत अर्ज भरतील, असेही सांगण्यात आले.
पात्र अर्जदारांमधून लॉटरी पद्धतीने अर्जदाराची निवड केली जाईल. यासाठी लॉटरीची सोडत 10 ऑक्टोबर किंवा अन्य दिवशी काढली जाणार आहे. तसेच परिवहन विभागाच्या महाऑनलाइन या संकेतस्थळावरही सोडतीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.