‘त्या’ नरभक्षक वाघावर विधानसभेत लक्षवेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:55 IST2018-11-28T22:55:19+5:302018-11-28T22:55:37+5:30
आॅक्टोबर महिन्यात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेऊन नरभक्षक वाघाने तिवसा तालुक्यातही नागरिकांना जेरीस आणले होते. या मुद्द्यावर बुधवारी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर विधानसभेत लक्षवेधी मांडत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धारेवर धरले.

‘त्या’ नरभक्षक वाघावर विधानसभेत लक्षवेधी
सूरज दाहाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : आॅक्टोबर महिन्यात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेऊन नरभक्षक वाघाने तिवसा तालुक्यातही नागरिकांना जेरीस आणले होते. या मुद्द्यावर बुधवारी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर विधानसभेत लक्षवेधी मांडत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धारेवर धरले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा व शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
नरभक्षक वाघाने धामणगाव रेल्वे तालुक्यात दोघांचा बळी घेतल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. तिवसा येथे नरभक्षक वाघ लोकवस्तीत शिरल्याने हजारो नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला होता. शेतीची कामे ठप्प झाले होते तसेच मजूर वर्गही वाघाच्या भीतीने शेतात जात नव्हता. शेतकºयांना याचा चांगलाच फटका बसला असल्याने नरभक्षक वाघाला जिवंत पकडणे व किंवा ठार मारण्याची मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती.
वाघाला बेशुद्ध करण्यासाठी आणलेल्या औषधाची वैधता संपल्याचा आरोपही यशोमती यांनी केला. शेतात हैदोस माजवणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची तसेच वन्यक्षेत्राची मोजणी करून शेतीलगतच्या जंगलाला कुंपण घालण्याची मागणी आ. ठाकूर यांनी केली.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी यशोमती ठाकूर यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर कार्यवाहीचे आश्वासन दिले.