दिग्गज साहित्यिकांच्या कथांची मेजवानी
By Admin | Updated: February 11, 2017 03:52 IST2017-02-11T03:52:11+5:302017-02-11T03:52:11+5:30
रविवारी पार पडलेल्या ३१० क्रमांकाच्या अभिनय कट्ट्याचे या वेळी विशेष आकर्षण ठरले ते ‘माणदेशी माणसं’, ‘कर्मचारी’, ‘चौथे चिमणराव’ ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ या कथासंग्रहांवर आधारित ‘द्विपात्रींचे सादरीकरण’.

दिग्गज साहित्यिकांच्या कथांची मेजवानी
ठाणे : रविवारी पार पडलेल्या ३१० क्रमांकाच्या अभिनय कट्ट्याचे या वेळी विशेष आकर्षण ठरले ते ‘माणदेशी माणसं’, ‘कर्मचारी’, ‘चौथे चिमणराव’ ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ या कथासंग्रहांवर आधारित ‘द्विपात्रींचे सादरीकरण’.
तेजस शिद्रुक याने ‘घोस्ट नेक्स्ट टू माय डोअर’, मंगेश सस्ते यांनी ‘चमचा’, शुभांगी गजरे हिने ‘आजीबाईची ‘वर्ल्ड टूर आणि डान्स’, रुक्मिणी कदम यांनी ‘राधाई’ व बालकलाकार सई कदम हिने ‘काम करा काम’ या एकपात्रीचे सादारीकरण सुरुवातीला कट्ट्याच्या कलाकारांनी केले. त्यानंतर, द्विपात्री सादरीकरणाला सुरु वात झाली. त्यामध्ये शुभांगी गजरे व अर्चना वाघमारे यांनी द.मा. मिरासदार यांच्या ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ या कथासंग्रहातील ‘बबीचे मंगळसूत्र’ या कथेवर धमाल सादरीकरण केले. त्यांच्याच ‘खव्याचा गोळा’ या गमतीशीर कथेचे सादरीकरण रु क्मिणी कदम, श्रावणी कदम व वीणा छत्रे यांनी केले. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘माणदेशी माणसं’ या कथासंग्रहातील ‘मुलाण्याचा बकस’ या कथेवर सादरीकरण नवनाथ कंचार व मयूर जाधव यांनी केले. लेखक व वेडसर पण निष्पाप असा अल्लाबक्ष अर्थात बकस यांच्यातील नात्याचे सुंदर चित्रण या कथेत आहे. व.पु. काळे यांच्या ‘कर्मचारी’ या कथासंग्रहातील ‘जोशी’ या कथेचे सादरीकरण कल्पेश डुकरे व दीपक मुळीक यांनी केले. भांडकुदळ म्हणून व तिरकस उत्तरांसाठी प्रसिद्ध असणारे जोशी आणि त्यांच्या तिरक्या व भांडकुदळ स्वभावाचे चित्रण या विनोदी अंगाने जाणाऱ्या कथेत आहे. चि.वि. जोशी यांच्या ‘चौथे चिमणराव’ या कथासंग्रहातील ‘माझी पीएच.डी. का हुकली’ या विनोदी कथेचे सादरीकरण प्रणव दळवी व शुभम चव्हाण यांनी केले. प्रशांत सकपाळ व महेश वर्मा यांनी ‘अनामिक’, रोहिणी राठोड, वैभवी वंजारे यांनी ‘कर्मचारी’, संकेत देशपांडे व योगेश मंडलिक यांनी ‘गणा महार’, अनिल काळेल व हितेश नेमाडे यांनी ‘पाठलाग’चे सादरीकरण केले. आज स्पेशल काय, या सदरामध्ये नवनाथ कंचार याने ‘रणांगण’ नाटकातील सदाशिवरावभाऊ पेशव्यांचा प्रवेश, हितेश नेमाडे याने ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेतील अफझलखान वधाच्या आधी शिवाजी महाराजांचा भवानीमातेशी संवाद साधणारा प्रसंग सादर केला. (प्रतिनिधी)