नेतृत्वाच्या धनवंतांना पायघड्या
By Admin | Updated: February 6, 2017 04:39 IST2017-02-06T04:39:44+5:302017-02-06T04:39:44+5:30
मुख्यमंत्र्यांनी ज्या पारदर्शकतेचा उच्चार केला, तिची पायमल्ली करून ठाण्यातील भाजपाच्या नेतृत्वाने आर्थिक बाजू मजबूत असलेल्यांनाच तिकीटवाटप केल्याचा आरोप

नेतृत्वाच्या धनवंतांना पायघड्या
ठाणे : मुख्यमंत्र्यांनी ज्या पारदर्शकतेचा उच्चार केला, तिची पायमल्ली करून ठाण्यातील भाजपाच्या नेतृत्वाने आर्थिक बाजू मजबूत असलेल्यांनाच तिकीटवाटप केल्याचा आरोप भाजपाच्या नाराज २२ बंडखोरांनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा देऊन पक्षाविरोधात दंड थोपटून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.
ठाण्यातील भाजपाच्या तिकीटवाटपावरून आधीच धुसफूस सुरू असून राडेदेखील झाले. आता तिकीट नाकारलेल्या निष्ठावंतांनी भाजपाच्या नेतृत्वावरच आरोप केले आहेत. रविवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शशी यादव (ठाणे शहर सचिव) संदीप तोरे, वनिता कांबळे, रमेश कांबळे, प्रदीप सिंग, सुभाष यादव, अरुण द्विवेदी, ऊर्मिला द्विवेदी, रमाशंकर यादव, सुनील शहा, दीप्ती चंदगडकर (महिला मोर्चा सरचिटणीस - ठाणे शहर) दिनेश चौहान, उषा मेहता, सीताराम डामरे, वीरेंद्र सावंत, तृप्ती जोशी पाटील, कुणाल भोईर, राजेश कटारिया, दीपक पटले, निलेश कोळी आदींसह इतर महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. ते देत असताना आपण पक्षाचेच काम करणार असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले. त्यातही या वेळी उपस्थित असलेले माजी उपमहापौर अॅड. सुभाष काळे यांनीदेखील नेतृत्वावर शंका उपस्थित करून आम्ही मागील कित्येक वर्षे पक्षासाठी काम करीत असतानादेखील बाहेरून आलेल्यांसाठी आमची तिकीटे कापली जात असल्याचा आरोप केला. तर, शशी यादव यांनी प्रांतवादाचा मुद्दा उपस्थित करून केवळ मी उत्तर भारतीय असल्यानेच माझे तिकीट कापल्याचे सांगितले. महिला मोर्चापैकी कोणत्याही महिलेला तिकीट दिले नसून नेतृत्वाला भेटण्याची संधीदेखील डावलली जात असल्याचे सांगून निष्ठावंतांना सापत्न वागणूक दिल्याचा आरोप तृप्ती जोशी-पाटील यांनी केला.
निष्ठावंतांचे तिकीट कापून बाहेरून आलेल्या पैसेवाल्यांसाठी पायघड्या घातल्या जात असल्याचा आरोप निलेश कोळी यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात बोलताना सांगितले होते की,नेत्यांच्या मागेमागे फिरणाऱ्या, हुजरेगिरी करणाऱ्यांना, नेत्यांच्या शिफारशीने येणाऱ्या लोकांना तिकीट दिले जाणार नाही. परंतु, त्यांच्या या आदेशालाच ठाण्यातील नेतृत्वाने तिलांजली दिल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला. आमच्यासारख्या जुन्या निष्ठावंतांना तिकीटवाटपात डावलण्यात आल्याने आम्ही पदांचे राजीनामे देत आहोत. २२ जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे, त्या भूमिकेत कायम राहणार असून अपक्ष म्हणून सर्व जण निवडणूक लढवू, असे यादव यांनी या वेळी स्पष्ट केले.
बंडखोरांबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या श्रेष्ठींनी एका आमदारास घेऊन गुप्त बैठक घेऊन दक्ष होऊन ‘सन्यस्थ खग्ड’ हातात घेऊन थेट धडा शिकवायचा, की संघ आरम करायचा याबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)