ठाणे : घंटाळी भागातील कोट्यवधी रुपयांचा भूखंड विकासकाने विकसीत करण्याकरिता घेतला होता. त्या जागेत तीन गाळे होते. ते गाळे काढून देण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे याने २५ लाख रुपयांची लाच मागितली होती. पाटोळेवर ठाण्यातील प्रभावशाली नेत्याचा वरदहस्त असतानाही मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गृह खात्याच्या इशाऱ्यावरून ही कारवाई केल्याची चर्चा आहे.
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, मुंबईतील एका विकासकाने घंटाळी भागात मोक्याचा भूखंड विकसीत करायला घेतला आहे. त्या जागेवर तीन अनधिकृत गाळे असून, त्यांचा एकच मालक आहे. हा गाळेधारक जागा रिकामी करीत नसल्याने विकासकाने अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली होती. गाळे जमीनदोस्त करण्याकरिता विकासकाने पाटोळे यांना १० लाख दिले होते. परंतु, पैसे दिल्यानंतरही गाळे जमीनदोस्त न केल्याने विकासक हैराण झाला होता. त्याने कारवाईसाठी वारंवार पाटोळे यांची भेट घेतली होती. एका प्रभावशाली नेत्याच्या जवळ असलेल्या या विकासकाला पाटोळे यांनी केबीन बाहेर पाच तास ताटकळत ठेवल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. विकासकाने कारवाईकरिता १० लाख दिल्यानंतर आणखी पैशांची मागणी पाटोळे यांनी विकासकाकडे केली. महापालिकेच्या वर्धापन दिनाचा सोहळा सुरू असताना, पाटोळे यांनी महापालिका मुख्यालयात विकासकाला पैसे घेऊन बोलवले. अखेर सांयकाळी ५:३० च्या सुमारास विकासक पैसे घेऊन आला, पाटोळे पैसे घेत असताना एसीबीच्या सापळ्यात अडकला.
अनेक वर्षांपासून पुनर्वसन रखडले
घंटाळी भागात विकासकाच्या जागेवर असलेले तीन गाळे हे मागील कित्येक वर्षांपासून त्याठिकाणी आहेत. काही वर्षांपूर्वी येथे रस्ता रुंदीकरण झाले आणि रस्त्यात गाळेधारकाची अर्धी जागा गेली.
महापालिकेने त्यांचे पुनर्वसन करून देणार, असे सांगितले होते. मात्र, त्यांचे पुनर्वसन अद्याप झाले नाही. आधी पुनर्वसन करा मगच जागा खाली करण्याची मागणी गाळेधारकाने केल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
उपायुक्त पाटोळे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी
ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना ठाणे न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची एसीबी कोठडी सुनावली. एका खासगी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला सहकार्य करून नोटीस बजावण्यासाठी पाटोळे यांनी दहा लाख रुपये घेतले होते. तर संपूर्ण कारवाईसाठी ५० लाखांची मागणी केली. यातील २५ लाखांचा पहिला हप्ता घेतानाच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई पथकाने बुधवारी पकडले.
नौपाडा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने ठाण्याच्या नौपाड्यातील विष्णूनगर भागातील जागा विकसित करण्यासाठी घेतली. या जागेत तीन दुकाने अनधिकृतपणे बांधलेली आहेत. त्याची तक्रार जागामालकाने महापालिकेकडे वारंवार करूनही त्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती. अखेर ८७ वर्षांच्या या जागामालकाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला सर्व अधिकारपत्र दिले. याच अनधिकृत दुकानांवर कारवाईसाठी या तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने उपायुक्त पाटोळे यांची पालिकेतील त्यांच्या दालनात भेट घेतली हाेती.
Web Summary : Thane Deputy Commissioner Shankar Patole demanded a bribe to demolish illegal shops. He took ₹10 lakh initially but demanded more. ACB caught him accepting ₹25 lakh. A builder had waited five hours for him.
Web Summary : ठाणे के उपायुक्त शंकर पाटोले को अवैध दुकानें गिराने के लिए रिश्वत लेते पकड़ा गया। उन्होंने पहले ₹10 लाख लिए, फिर और मांगे। एसीबी ने ₹25 लाख लेते हुए रंगे हाथों पकड़ा। एक बिल्डर को पांच घंटे इंतजार कराया।