एलबीटीत कर्मचारी अनावश्यक?
By Admin | Updated: November 17, 2015 00:50 IST2015-11-17T00:50:52+5:302015-11-17T00:50:52+5:30
१ आॅगस्टपासून स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) चौकटीत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनाच ठेवल्याने असे १५ ते २० खातेदारच मीरा-भार्इंदर महापालिकेत

एलबीटीत कर्मचारी अनावश्यक?
- धीरज परब, मीरा रोड
१ आॅगस्टपासून स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) चौकटीत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनाच ठेवल्याने असे १५ ते २० खातेदारच मीरा-भार्इंदर महापालिकेत उरले आहेत. शिवाय, चालू वर्षाची ९५ टक्के वसुली झालेली असताना तब्बल २४ शिपाई व सफाई कामगारांसह ७ लिपीक व वर्ग-२ चे ४ अधिकारी अशा एकूण ३५ जणांची एलबीटीमध्ये आवश्यकता आहे का, असा प्रश्न केला जात आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एलबीटी विभागाचे मॅक्सस मॉलमागे स्वतंत्र कार्यालय आहे. शहरात एलबीटीचे २१ गट असून पूर्वी वर्ग-२ चे १० अधिकारी, ५ वरिष्ठ लिपीक, १२ लिपीक, ५ लेखापरीक्षण लिपीक व २४ शिपाई-सफाई कामगार असा ताफा होता. १ आॅगस्टपासून एलबीटी जवळपास बंदच झाल्याने फारसे काम उरलेले नाही. शिवाय, एप्रिल ते जुलै २०१५ या चार महिन्यांचे ७० कोटी वसूल करण्याचे उद्दिष्टदेखील जवळपास पूर्ण झालेले आहे. त्यामुळे प्रशासनाने काही प्रमाणात एलबीटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली केली. परंतु, एलबीटीमध्ये अद्यापही वर्ग-२ चे ४ अधिकारी, ३ वरिष्ठ लिपीक, ४ लिपीक तर शिपाई-सफाई कामगार मात्र तब्बल २४ तैनात आहेत. अन्य विभागांत अधिकारी-कर्मचाऱ्यांची चणचण असताना एलबीटीमध्ये नाहक कर्मचारीवर्ग ठेवण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांना अन्यत्र गरज असलेल्या विभागांत पाठवल्यास तेथील काम मार्गी लागेल, असा सूर उमटू लागला.
शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार व्यावसायिकांनी आपले मागील वर्षातील विवरणपत्र सादर केले नसून तपासणी प्रलंबित आहे. या थकबाकीदारांना शासनाकडून मार्च २०१६ पर्यंतची मुदत असली तरी थकीत रक्कम व कामकाज पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच सर्व रेकॉर्ड लावण्याचे काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांची गरज आहे.
- सुदाम गोडसे (स्थानिक संस्था कर विभागाचे प्रमुख)