मनसेकरिता प्रचाराचा थर लावा
By Admin | Updated: February 8, 2017 04:11 IST2017-02-08T04:11:03+5:302017-02-08T04:11:03+5:30
दहीहंडीवर न्यायालयाने बंधने आणली तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो, आता तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन ठाणे मनसेने गोविंदा पथकांना केले आहे

मनसेकरिता प्रचाराचा थर लावा
ठाणे : दहीहंडीवर न्यायालयाने बंधने आणली तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो, आता तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन ठाणे मनसेने गोविंदा पथकांना केले आहे. पालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ठाणे मनसेने गोविंदा पथकांना मनसेच्या प्रचाराकरिता थर लावण्याची विनंती केली आहे. ‘मराठी अस्मिता आणि संस्कृती जपणाऱ्या मनसेचा हाती घ्या झेंडा’ असे आवाहन केले आहे.
ठाणे मनसेने काढलेले पत्रक हे जवळपास सर्व गोविंदा पथकापर्यंत पोहचवून संपर्ककरण्यात आला आहे. दहीहंडीच्या जीवावर अनेक कार्यकर्ते नेते म्हणून राजकारणात नावारूपाला आले. आमदार झाले. परंतु जेव्हा दहीहंडीच्या थरांवर निर्बंध घातले गेले तेव्हा मग ते रस्त्यावर का उतरले नाही? मराठी मतांना गृहीत धरण्यात आले. ‘जलीकट्टू’ हा खेळ बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले तर अवघा तामिळनाडू रस्त्यावर उतरला. निर्णय बदलण्यास भाग पाडले. पण महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा असलेल्या हिंदू धर्मीयांच्या दहीहंडीवर कोर्टाने निर्बंध लादण्यात आले तर एकटी मनसे रस्त्यावर उतरली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तरु णाच्या मागे उभे राहिले.
मराठीचा कळवळा आणणाऱ्या अन्य पक्षांनी मात्र तलवारी म्यान केल्या आहेत अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता टीका केली. (प्रतिनिधी)