‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा करावा
By Admin | Updated: April 24, 2017 02:11 IST2017-04-24T02:11:44+5:302017-04-24T02:11:44+5:30
लव्ह जिहादचे प्रमाण वाढते आहे. पण त्याची आकडेवारी केंद्र व राज्य सरकारकडे नाही. धर्माचा आयुध म्हणून वापर करुन अनेक

‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा करावा
ठाणे : लव्ह जिहादचे प्रमाण वाढते आहे. पण त्याची आकडेवारी केंद्र व राज्य सरकारकडे नाही. धर्माचा आयुध म्हणून वापर करुन अनेक मुलींची, महिलांची फसवणूक केली जाते. याविरोधात केंद्र व राज्य सरकारने कडक कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
२९ व्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनात गडकरी रंगायतन येथे ‘भारतातल्या समाज सुधारणा : विविध प्रयत्न’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात त्या बोलत होत्या.
सावरकरांचे कृतीशील विचार अंगीकारण्याची गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकारांनी स्पर्श बंदी, व्यवसाय बंदी, वेदोक्त बंदी, सिंधु बंदी, शुद्धी बंदी, रोटी - बेटी बंदी यासारख्या सात बंदीचा उल्लेख केला आहे. त्या सात बंदी आजही समाजात मूळ धरून असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सावरकरांचे विचार स्वीकारणे सोपे नाही. त्यांनी हिंदु धर्मातील सुधारणेसाठी एक प्रकारे आव्हान दिले होते आणि या आव्हानासाठी त्यांना अनेक वेळा संघर्ष करावा लागला. स्त्री विषयक ज्या ज्या सुधारणा भारतात झाल्या त्या सहजासहजी स्वीकारल्या गेल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कर्वे, फुले, सावरकरांनी धर्माची चौकट बदलण्याचा प्रयत्न केला. फसवणूकीने केलेल्या धर्मांतराविरुद्ध कायदा केला पाहिजे अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. आत्महत्त्या करण्यापेक्षा सावरकरांना अपेक्षित सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबावा. श्रद्धा असावी यात दुमत नाही. परंतु अंधश्रद्धेमुळे होणारे स्त्रियांचे शोषण रोखण्यासाठी कडक कायदा होण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
समाजातील अनिष्ट रुढी रोखण्यासाठी सरकारने वाट बघायला लावू नये. हिंदू धर्म सुधारावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक वर्षे वाट पाहावी लागली. पण तसे झाले नाही. त्यामुळे त्यांच्यासारखे धर्मांतर पुन्हा घडू नये यासाठी राजकीय नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सहा ते सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. तिला न्याय मिळविण्यासाठी किती वाट बघायची, असा प्रश्न देखील उपस्थित केला. रोटी बेटी बंदी प्रमाणे काही बंदी या समाजात शिल्लक आहेत. स्वेच्छा विवाहबंदी आजही समाजात आहे असे सांगून आर्थिक- समता बंदी, जातीय समानता बंदी, स्त्री पुरूष समानता बंदी, मानव अधिकार बंदी यांचा पगडा आजही समाजावर आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
परिसंवादात सहभागी झालेले वक्ते अॅड. किशोर जावळे यांनी सावरकर ही फुंकून फुंकून पिण्यासारखी गोष्ट नाही असे सांगितले. आम्हाला सावरकर सिलेक्टेड हवे असतात. जिथे सावरकरांच्या समाजसुधारणेचा, विज्ञाननिष्ठेचा विचार येतो तेव्हा आम्ही त्यांच्यापासून दूर जातो. त्यांना एकटे पाडल्याची किंमत आज समाज मोजत आहे.
हिंदुत्वाचा गाडा पुढे नेण्यासाठी त्यांना डावलून पुढे जाता येणार
नाही. आज आणि उद्या त्यांचे विचार स्वीकारावेच लागतील, असे सांगत सावकरांचे विचार वाचा आणि
त्यातून तुमच्यात बदल घडवा. तेव्हा समाज सुधारेल, असे आवाहनही
त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांनी समाज सुधारणेसाठी दीर्घकाळ
प्रयत्न करावे लागतील, यावर भर दिला. समाजातील विषमता, उच्च-नीचता संपविण्यासाठी सावरकरांचे विचार सर्वत्र पोहोचविण्याची
गरज आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)