केडीएमसीच्या कंत्राटी डॉक्टरसह नर्सच्या भरतीला मोठा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:38 IST2021-05-01T04:38:04+5:302021-05-01T04:38:04+5:30

कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिकेने आणखीन कोविड रुग्णालये उभी करण्यासाठी निविदा ...

Large response to nurse recruitment with KDMC’s contract doctor | केडीएमसीच्या कंत्राटी डॉक्टरसह नर्सच्या भरतीला मोठा प्रतिसाद

केडीएमसीच्या कंत्राटी डॉक्टरसह नर्सच्या भरतीला मोठा प्रतिसाद

कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिकेने आणखीन कोविड रुग्णालये उभी करण्यासाठी निविदा मागविलेल्या आहेत. या रुग्णालयांकरिता डॉक्टरसह नर्सचा स्टाफ लागणार आहे. त्याकरिता प्रशासनाने अर्ज मागविले होते. या कंत्राटी भरतीसाठी शुक्रवारी मुलाखती होत्या. त्यासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत शेकडोंच्या प्रमाणात उमेदवार आले होते. मात्र, त्यांना बसण्यासाठी साधी खुर्ची उपलब्ध करून देण्यात आली नाही. सहाय्यक नर्सपदासाठी आलेल्या महिला उमेदवारांना चक्क जमिनीवर बसविण्यात आले होते.

तीन विविध ठिकाणी मुलाखतींकरिता आलेल्यांचे अर्ज स्वीकारले जात होते. डॉक्टर, नर्स, सहाय्यक नर्स, टेक्निशियन पदांसाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत जास्त उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. डॉक्टर पदासाठी ३४ जागा असल्या तरी १०० पेक्षा जास्त उमेदवार मुलाखतीच्या रांगेत उभे होते. सहाय्यक नर्सच्या १६ जागा असताना २०० पेक्षा जास्त महिला उमेदवारांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते. सहाय्यक नर्सपदासाठी आलेल्या महिला उमेदवारांना महापालिकेच्या पार्किंगच्या जागेत जमिनीवर बसविण्यात आले. त्यांना साधी खुर्चीसुद्धा बसण्यासाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिली नाही.

सहाय्यक नर्सपदाच्या मुलाखतीसाठी आलेल्या माया खंडाळे यांनी सांगितले की, जागा कमी आहेत. उमेदवार जास्त आलेले आहेत. सकाळपासून प्रतीक्षेत आहोत. सहाय्यक नर्सपदासाठी जास्त महत्व दिले जात नाही. आम्हाला खाली बसविण्यात आले आहे. एका उमेदवाराने सांगितले की, कोविड काळापुरती ही कंत्राटी भरती आहे. दिला जाणारा पगार हा कमी आहे. नाशिकहून डॉक्टर पदासाठी आलेल्या तरुणीने सांगितले की, ती मुलाखतीसाठी आली आहे. तिच्या वास्तव्याची सोय महापालिकेकडून केली जाईल, तरच ती ही संधी स्वीकारणार आहे.

.....

कोरोनाची पहिली लाट आली तेव्हाही महापालिकेची दोन रुग्णालये आणि पंधरा नागरी सुविधा केंद्रे होती. त्यासाठी महापालिकेने जम्बो कोविड रुग्णालये उभारली. त्यासाठी डॉक्टर, नर्सच्या ३९१ पदांची भरती केली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्यावर ही पदे पुन्हा कार्यान्वित केली गेली आहेत. त्याव्यतिरिक्त या मुलाखतींद्वारे आणखी नव्याने कंत्राटी डॉक्टर, नर्सची पदे भरली जाणार आहेत.

-------------------

Web Title: Large response to nurse recruitment with KDMC’s contract doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.