जमीन मोजणीसाठी ७५ हजारांची लाच घेणारा ठाण्याचा भूकरमापक अटकेत
By जितेंद्र कालेकर | Updated: March 5, 2025 23:40 IST2025-03-05T23:40:17+5:302025-03-05T23:40:38+5:30
उपअधीक्षकालाही घेतले ताब्यात: एसीबीची कारवाई

जमीन मोजणीसाठी ७५ हजारांची लाच घेणारा ठाण्याचा भूकरमापक अटकेत
जितेद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: प्रलंबित शासकीय काम करून देण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ७५ हजारांची लाच स्वीकारणाºया ठाणे भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक श्रीकांत रावते यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. तर उपअधीक्षक चांगदेव मोहळकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यातील तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या शासकीय प्रलंबित कामाच्या अनुषंगाने भूकरमापक रावते आणि उपअधीक्षक मोहळकर यांनी लाचेची मागणी केल्याची तसेच जमीन मोजणी करुन देण्यासाठी मोहळकर यांपी यापूर्वी एक लाख ९५ हजारांची लाच घेतल्याबाबत २७ फेब्रुवारी २०२५ रोजी तक्रार केली होती. त्याच अनुषंगाने ठाणे एसीबीने पडताळणीची कारवाई केली. यामध्ये रावते यांनी या जमिनीचे मोजमाप व इतर प्रलंबित कामासाठी स्वत:साठी आणि उपअधीक्षक यांच्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. यामध्ये मोहळकर यांनी या प्रकाराला प्रोत्साहन दिल्याचेही आढळले.
या प्रकरणी ठाणे एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबी पथकाने ५ मार्च रोजी लाचखोरास पकडण्यासाठी सापळा लावला. त्यावेळी तक्रारदाराकडून ७५ हजारांची लाच स्वीकारतांना रावते याला रंगेहाथ पकडण्यात आले. तर उपअधीक्षक मोहळकर यांचा देखील सहभाग आढळून आल्याने त्यांना देखील एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे.