सीए संस्थेला भूखंड मंजूर
By Admin | Updated: December 22, 2016 05:43 IST2016-12-22T05:43:54+5:302016-12-22T05:43:54+5:30
केडीएमसीने शैक्षणिक उद्देशासाठी आरक्षित असलेला चिकणघर येथील १७०० चौरस मीटर आकाराचा भूखंड चार्टर्ड अकाउंट संस्थेला

सीए संस्थेला भूखंड मंजूर
कल्याण : केडीएमसीने शैक्षणिक उद्देशासाठी आरक्षित असलेला चिकणघर येथील १७०० चौरस मीटर आकाराचा भूखंड चार्टर्ड अकाउंट संस्थेला दिला आहे. या जागेवर ही संस्था सहा मजली इमारत बांधणार आहे.
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंट आॅफ इंडिया या संस्थेच्या कल्याण- डोंबिवली शाखेची स्थापना २०१६ मध्ये झाली. या संस्थेचे अध्यक्ष मदन आचवल यांनी महापालिका प्रशासनाकडे शैक्षणिक उपक्रमासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. महापालिकेने या संस्थेला चिकणघर येथील १७०० चौरस मीटर जागा देण्याचा ठराव मंगळवारी झालेल्या महासभेत मंजूर केला. हा ठराव मंजूर करून घेण्यासाठी मनसे नगरसेवक मंदार हळबे व भाजपाचे गटनेते राहुल दामले यांनी प्रयत्न केले. तसेच सभागृहात महासभेच्या वेळी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र, भाजपा नगरसेवक व शिक्षण मंडळाचे सभापती दया गायकवाड यांनी भूखंड देण्यास विरोध केला. त्या वेळी त्यांनी चांगल्या कामासाठी विरोध करू नये, अशी विनंती हळबे व दामले यांनी केली. एक संस्था त्या ठिकाणी चांगल्या उद्देशाने उभी राहणार आहे. मात्र, शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी व दीपेश म्हात्रे यांनी भूखंड देण्यास आमचा विरोध नाही. पण, एखादा विशिष्ट भूखंड देण्यामागे काय उद्देश आहे. त्यांना जागाच द्यायची असल्यास खंबाळपाडा परिसरात द्यावी. यावर महापौरांनी शैक्षणिक उद्देशासाठी ही जागा देत असल्याचे स्पष्ट करीत सदस्यांचा विरोध नोंदवून घेत हा ठराव एकमताने मंजूर केला.
आचवल यांनी सांगितले की, चिकणघर येथील जागेत सहा मजली इमारत उभारली जाणार आहे. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना हाईल. इमारत बांधण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच भूखंडापोटी महापालिकेस तीन कोटींचा प्रीमियम भरावा लागणार आहे. (प्रतिनिधी)