The labor train did not arrive even after waiting for 12 hours; The workers made a fuss | श्रमिक ट्रेन १२ तासांच्या प्रतीक्षेनंतरही आलीच नाही; मजुरांनी घातला गोंधळ

श्रमिक ट्रेन १२ तासांच्या प्रतीक्षेनंतरही आलीच नाही; मजुरांनी घातला गोंधळ

कल्याण : कल्याण रेल्वेस्थानकातून मंगळवारी जौनपूर येथे श्रमिक ट्रेन सोडली जाणार असल्याने शेकडो परप्रांतीय मजूर ट्रेनच्या प्रतीक्षेत होते. तब्बल १२ तास उलटूनही ट्रेन न आल्याने मजुरांचा संयम सुटून त्यांनी गोंधळ घातला. त्यावर नियंत्रण मिळवताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. रेल्वेने मंगळवारी श्रमिक ट्रेनचे नियोजनच नव्हते, असा खुलासा केला, तर पोलिसांनी नियोजन असल्याचे कळवण्यात आाल्याचे स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशातील जौनपूरला विशेष श्रमिक ट्रेन सोडली जाणार असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर रेल्वेस्थानकात गर्दी उसळू नये म्हणून मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना विठ्ठलवाडी डेपोच्या परिसरात थांबवून ठेवले होते. भरदुपारी उन्हाचे चटके सोसत हे मजूर बसून राहिले. दुपार सरली, संध्याकाळ झाली; मात्र रात्री उशिरापर्यंत ट्रेनच आली नाही. त्यामुळे या मजुरांचा संयम सुटून त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

या मजुरांना आवरताना, त्यांची समजूत काढताना पोलिसांची दमछाक झाली. काही मजूर महापालिकेजवळच्या सुभाष मैदानातही जमा झाले होते. रेल्वे प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी ट्रेनचे नियोजनच नसल्याचे सांगून हात वर केले. पोलिसांनी नियोजन असल्याचे सांगितल्यामुळेच बंदोबस्त ठेवल्याचे स्पष्ट केले. अखेर, बुधवारी दुपारी कल्याण ते वाराणसी या ट्रेनचे नियोजन केल्याने कल्याण रेल्वेस्थानकाबाहेर रांगा लावल्या होत्या.

रेल्वेच्या कारभारावर नाराजी

ट्रेनचे नियोजन नसते, तर कधी ट्रेन भलत्याच दिशेला जाते. ट्रेन उशिराने येते. या विविध तक्रारी १५ दिवसांपासून सुरू आहेत. इतकेच नव्हे तर दिल्लीहून कल्याणच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या ट्रेनमध्ये विद्यार्थ्यांचे हाल झाल्याप्रकरणी रेल्वेच्या कारभारावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचीच पुनरावृत्ती मंगळवारी पुन्हा झाली आहे.

Web Title: The labor train did not arrive even after waiting for 12 hours; The workers made a fuss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.