निकृष्ट जेवणामुळे कोविड रुग्णांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:46+5:302021-04-04T04:41:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील डेंटल कॉलेजमध्ये पालिकेने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण बेचव ...

निकृष्ट जेवणामुळे कोविड रुग्णांची उपासमार
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील डेंटल कॉलेजमध्ये पालिकेने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण बेचव व निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक रुग्ण जेवण टाकून देत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांवर उपाशीपोटी औषधे घेण्याची वेळ येत आहे. निकृष्ट जेवणाची तक्रार करून देखील पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रुग्णांनी केला.
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने डेंटल कॉलेजमध्ये कोळी रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असून, या रुग्णालयात ५०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ४००हून अधिक रुग्ण गेल्या महिन्याभरात या ठिकाणी दाखल झाले आहेत. रुग्णांची वाढती संख्या पालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या ठिकाणी सुविधा पुरवण्यात प्रशासन कमी पडत आहे. कोविड रुग्णालयाच्या तक्रारींची मालिका सुरू झाली असून, रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या अभिप्राय नोंदवहीत तक्रारींचा खच पडला आहे. रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. सकाळचा नाश्ता वगळता दुपारचे आणि रात्रीचे जेवण वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. जेवणाला चव नसल्याने आणि जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक रुग्ण ताटात जेवण तसेच टाकून देत आहेत. न जेवलेल्या ताटांचा खच रुग्णालयाच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये पाहायला मिळत आहे. रुग्णांना पालिका पुरवत असलेले जेवण जात नसल्याने त्यांना औषधे घेताना त्रास होतो. कोविडवरील औषधांसोबत रुग्णांच्या पोटात सकस, चवदार अन्न जाणे गरजेचे आहे. निकृष्ट जेवणामुळे रुग्णांवर उपाशीपोटी औषधे घेण्याची वेळ येत आहे. रुग्णांनी केलेल्या तक्रारींची किमान दखल घ्यावी, अशी माफक अपेक्षा रुग्णांच्या नातलगांनी व्यक्त केली.
-------------
वाचली