शहापूर तालुक्यात होणार कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:43 IST2021-04-02T04:43:04+5:302021-04-02T04:43:04+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यात कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी केली जात असताना ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध ...

शहापूर तालुक्यात होणार कोविड सेंटर
भातसानगर : शहापूर तालुक्यात कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी केली जात असताना ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेत शहापूर तालुक्यामध्ये येत्या दोन दिवसांत २०० खाटांचे कोविड सेंटर सुरू होणार असल्याची माहिती शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी दिली.
शहापूर तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून या रुग्णांना ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर मानसिक व आर्थिक त्रास होतो. त्यामुळे तालुक्यामध्ये कोविड सेंटर तयार व्हावे, अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. या मागणीचा ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर शहापूर तालुक्यासाठी कोविड सेंटर मंजूर करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये गोठेघर वाफे येथे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याने तालुक्यातील रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली.
तालुक्याची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा अधिक आहे.