कोकण रेल्वे अखेर रुळावर!
By Admin | Updated: August 25, 2014 23:25 IST2014-08-25T23:24:13+5:302014-08-25T23:25:25+5:30
२६ तासांनी मार्ग वाहतुकीसाठी खुला

कोकण रेल्वे अखेर रुळावर!
रत्नागिरी : अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक अखेर आज, सोमवारी ‘रुळावर’ आली. तब्बल २६ तासांनंतर हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र, वेळापत्रकात सुसूत्रपणा येण्यासाठी आठ गाड्या रद्द करण्यात आल्या. तरीही आज अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. काल, रविवारी खेड तालुक्यातील वीर ते करंजाडीदरम्यान रेल्वेरूळ तुटल्याने मालवाहतुकीचे आठ डबे रुळांवरून घसरले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. मात्र मोठ्या प्रमाणावर कोकणाकडे आलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस.टी.च्या मदतीने अलीकडे-पलीकडे प्रवाशांना सोडून त्या-त्या स्थानकात उभ्या असलेल्या गाड्या परतीच्या मार्गावर वळविण्यात आल्या. तरीही हजारो प्रवाशांचे हाल झाले.रुळाचे काम पूर्ववत पूर्ण झाल्यानंतर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून रेल्वेवाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आला. त्यानंतर मत्स्यगंधा एक्स्प्रेस पहिल्यांदा मुंबईकडे रवाना झाली. असे असले तरी, रेल्वे अजूनही दोन ते तीन तास उशिरानेच धावत आहेत. वेळापत्रक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)