वाचकांसाठी खुले केले ज्ञानभांडार; दुर्मीळ संदर्भग्रंथांचे भरवले प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 02:00 AM2019-04-24T02:00:10+5:302019-04-24T02:00:22+5:30

कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम

Knowledge base open to readers; Exhibit with rare bibliographies | वाचकांसाठी खुले केले ज्ञानभांडार; दुर्मीळ संदर्भग्रंथांचे भरवले प्रदर्शन

वाचकांसाठी खुले केले ज्ञानभांडार; दुर्मीळ संदर्भग्रंथांचे भरवले प्रदर्शन

Next

- जान्हवी मोर्ये 

डोंबिवली : समग्र सेतू माधवराव पगडी संपूर्ण खंड, स्वामी विवेकानंद ग्रंथावली, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांसारख्या दुर्मीळ संदर्भग्रंथांचा खजिनाच कल्याण सार्वजनिक वाचनालयाने वाचकांसाठी खुला केला आहे. ठाणे, पालघरच्या वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

जागतिक पुस्तक दिनानिमित्त मंगळवारी सार्वजनिक वाचनालयातर्फे दुर्मीळ ग्रंथ आणि संदर्भग्रंथांचे हे पहिलेच प्रदर्शन भरवण्यात आले आहे. वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या वाचनालयाला १५६ वर्षांची परंपरा आहे. अनेक विषयांवरील संदर्भग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहेत. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग होतो. वाचनालयाच्या रामबाग येथील शाखेत विद्यार्थी बसून दुर्मीळ ग्रंथाच्या वाचनाचा आनंद घेतात. हे दुर्मीळ गं्रथ त्यांना घरी नेण्याची परवानगी नाही. ही सेवा अभ्यासकांना मोफत उपलब्ध करून दिली जाते. संदर्भग्रंथाविषयी अभ्यासकांना माहिती व्हावी. प्रदर्शनाच्या माध्यमातून ते वाचकांपर्यंत पोहोचतील. ज्यावेळी वाचकांना त्यांची गरज असेल, तेव्हा ते त्यांचा वापर करतील. तीन हजारांहून अधिक दुर्मीळ व संदर्भग्रंथ या प्रदर्शनात मांडले आहेत. या प्रदर्शनासाठी वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, ग्रंथालयातील कर्मचारी, ग्रंथपाल यांनी मेहनत घेतली.

दुर्मीळ ग्रंथ पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे. ती संधी या प्रदर्शनामुळे मिळत असल्याचे वाचक अरुण विसपुते यांनी सांगितले. या प्रदर्शनाच्या दर्शनी भागात भारतीय संविधानाची प्रत ठेवली आहे. भारतीय संस्कृतीकोश, भक्तिकोश, ज्ञानकोश, मराठी विश्वचरित्रकोश, शब्दकोश, व्यायामकोश, वारकरी संप्रदायकोश, ज्ञानेश्वरी, बायबल, कुराण, डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण साहित्य, बहुतसमांतरकोश, भारतीय समाजविज्ञानकोश, रामायणसारखे ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

डिजिटायझेशन सुरू
१८०० पासूनची पुस्तके या प्रदर्शनात आहेत. यातील काही पुस्तकांचे मूल्य ५० पैसे, तर काहींचे दोन ते तीन रुपये आहे. या पुस्तकांना वाळवी लागू नये, म्हणून औषधफवारणी केली जाते. या दुर्मीळ ग्रंथांचे जतन करण्यासाठी डिजिटलायझेशन सुरू आहे. थोड्याच दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती भिकू बारस्कर यांनी दिली.

Web Title: Knowledge base open to readers; Exhibit with rare bibliographies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे