स्मार्ट सिटीचा राजने आधी अभ्यास करावा
By Admin | Updated: October 28, 2015 00:50 IST2015-10-28T00:50:13+5:302015-10-28T00:50:13+5:30
स्मार्ट सिटी या उपक्रमासाठी केंद्राच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार असून यात राज्याचा हिस्सा २५ टक्के इतका राहणार आहे

स्मार्ट सिटीचा राजने आधी अभ्यास करावा
कल्याण : स्मार्ट सिटी या उपक्रमासाठी केंद्राच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार असून यात राज्याचा हिस्सा २५ टक्के इतका राहणार आहे. या उपक्रमाची पूर्ण माहीती न घेता असे भाष्य करणे चुकीचे आहे. अभ्यास न करता केलेले हे भाष्य आहे, असा पलटवार वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कल्याणातील प्रचार सभेत केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण पूर्वेतील रविवारच्या प्रचार सभेत भाजपच्या स्मार्ट सिटी उपक्रमाची खिल्ली उडवली होती. सरकारकडे पैसा नसल्याने दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी पेट्रोल डिझेलवर कर लावला गेला आहे. मग स्मार्ट सिटीसाठी निधी आणणार तरी कोठून? असा सवाल केला होता. दरम्यान कल्याण पश्चिमेतील मिलिंदनगरमध्ये सोमवारी भाजपच्या प्रचार सभेसाठी आलेल्या मुनगंटीवार यांना राज यांच्या वक्तव्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी अभ्यास करून भाष्य करा, असा सल्ला त्यांना दिला. नाशिक महापालिकेच्या विकासाचे दाखले राज हे देत असलेतरी नागपूरमध्ये भाजपाने काय विकास केला आहे, याबाबत लालकिल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक केले आहे, हे देखील विसरून चालणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
स्मार्टपणे मतदान करा तरच शहरे स्मार्ट होतील, असे आवाहन मुनगंटीवार यांनी यावेळी नागरीकांना केले. कल्याण शहराची सध्याची स्थिती प्रकाशाकडून अंधाराकडे अशी झाली आहे. गेली अनेक वर्षे महापालिकेत आमच्याच मित्रपक्षाची सत्ता होती. परंतु, शहरे स्मार्ट झाली नाहीत. पार्किं गची समस्या, पुरेसे पाणी नाही, खड्डेमय रस्ते अशा विविध समस्यांनी शहरे ग्रासलेली आहेत. याउपरही ‘करून दाखविले’ म्हणता मग उमेदवार का उभे करता असा टोलाही शिवसेनेचे नाव न घेता यावेळी त्यांनी लगावला. मत मागण्याचा अधिकार गमावला आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचाही समाचार घेतला. मलिंदनगरवासियांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा जो वन जमिनीचा प्रश्न आहे तो या निवडणुकीनंतर निकाली काढू असा दिलासा त्यांनी यावेळी दिला. यावेळी खासदार कपील पाटील, आमदार नरेंद्र पवार, किसन कथोरे यांच्यासह अर्जुन म्हात्रे, लक्ष्मी बोरकर आणि दयानंद गायकवाड हे उमेदवार व्यासपिठावर उपस्थित होते.