घरपोच गणवेशामुळे मुले खूश!
By Admin | Updated: May 23, 2016 02:32 IST2016-05-23T02:32:53+5:302016-05-23T02:32:53+5:30
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून घरपोच गणवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ३० जूनपूर्वी मुलांपर्यंत गणवेश पोहोचलेले असतील

घरपोच गणवेशामुळे मुले खूश!
सदानंद नाईक, उल्हासनगर
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून घरपोच गणवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ३० जूनपूर्वी मुलांपर्यंत गणवेश पोहोचलेले असतील. मुलांमध्ये शाळेत येण्याची ओढ वाढीस लागावी, याकरिता हा निर्णय घेतल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
उल्हासनगर पालिका शिक्षण मंडळ नेहमीच वादात राहिले आहे. शाळांच्या पटसंख्येवर ६ हजार ६०० विद्यार्थी दाखवले आहेत. त्यापैकी ३० टक्के विद्यार्थी बोगस दाखवल्याचा आरोप होत आहे. घरोघर गणवेश पाठवले तर विद्यार्थ्यांची नेमकी संख्या समजेल व आरोपांची शहानिशा करता येईल. तसेच मंडळाची प्रतिमा सुधारण्याकरिता शाळा डिजिटल करणे, मुलांना घरपोच गणवेश देणे, शैक्षणिक साहित्याचे वाटप पहिल्याच आठवड्यात करणे आदी उपक्रम राबवण्याचा संकल्प केल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले.
एकीकडे प्रतिमा सुधारण्याकरिता वरील उपक्रम राबवतानाच दुसरीकडे पालिका प्रशासनाने बोगस विद्यार्थ्यांबाबत शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुढील महिन्यात विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणात बोगस विद्यार्थी आढळल्यास संबंधित शिक्षक व मुख्याध्यापक यांना जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.
शैक्षणिक साहित्य, गणवेश, चिक्की यांची खरेदी करताना पटसंख्या विचारात घेतली जाते. विद्यार्थ्यांची कमी संख्या असताना जादा खरेदी केल्याने मंडळाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे लेंगरेकर यांनी कबूल केले.
शाळांच्या पुनर्बांधणीसह डिजिटल शाळांची संकल्पना उपायुक्त लेंगरेकर यांची आहे. शाळांना २५ लाखांच्या निधीतून संगणकांसह प्रोजेक्टर पुरवले आहे. डिजिटल शाळांची संकल्पना राबवायची आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवीचे वर्ग सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)