‘खुजे हिंदुत्व असलेल्यांनी ठाकरे यांना डावलले’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 02:44 AM2020-08-04T02:44:38+5:302020-08-04T02:45:03+5:30

कल्याणमधील राजेंद्र देवळेकर हे १९८७ साली भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर सरचिटणीस होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आदेशानुसार राज्यातील वेगवेगळ्या शहरांत रामशिलापूजन करण्यास सांगण्यात आले होते

'Khuje Hindutva supporters beat Thackeray' | ‘खुजे हिंदुत्व असलेल्यांनी ठाकरे यांना डावलले’

‘खुजे हिंदुत्व असलेल्यांनी ठाकरे यांना डावलले’

Next

कल्याण : रामशिलापूजन ते कारसेवा हे सगळे वातावरण हिंदुत्वाच्या विचारांनी भारावलेले होते. राममंदिर उभारणीच्या त्या आंदोलनात शिवसेनेचा मोठा पुढाकार होता. आम्ही दोघे त्या सर्व घडामोडींचे साक्षीदार आहोत. ही पार्श्वभूमी असतानाही राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेनापक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित न करण्याबद्दल कल्याणमधील शिवसैनिकांच्या मनात प्रचंड खदखद आणि संताप आहे, असे या दोघांनी सांगितले.

कल्याणमधील राजेंद्र देवळेकर हे १९८७ साली भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर सरचिटणीस होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आदेशानुसार राज्यातील वेगवेगळ्या शहरांत रामशिलापूजन करण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी देवळेकर यांनी त्यांच्या प्रभागात रामशिलापूजन केले होते. प्रत्येक प्रभागात ती रामशिला रथातून फिरवली जात होती. एकप्रकारे ते राममंदिर उभारणीचे जनजागरण सुरू होते. ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनायेंगे’, ‘बच्चा बच्चा राम का, जन्मभूमी के काम का’, ‘जिस हिंदू का खून न खौले, वो खून नही पानी है’,‘राम भक्ती के काम न आये वो बेकार जवानी है’, या घोषणा त्यावेळी दिल्या जात होत्या. त्याचवेळी ठाण्यातील चंदनवाडी शिवसेना शाखेने गणेशोत्सवात दिघे यांच्या देखरेखीखाली राम मंदिराचा भव्य देखावा तयार केला होता. आधी मंदिर आणि मग धनुर्धारी रामाची ५२ फुटी प्रतिमा जमिनीतून वर येत होती. हा देखावा सगळ्यांचे लक्ष वेधत होता. या आंदोलनात शिवसेनेचा पुढाकार होता.
कॉलेजजीवनापासून शिवसैनिक असलेले कल्याणचे सचिन बासरे यांनी १९८७ साली ‘श्रीराम’नाम कोरलेली वीट घेऊन घरोघरी फिरविली. महिला त्या विटेची मनोभावे पूजा करीत. एका विटेची किंमत पाच रुपये याप्रमाणे लोक राममंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी देत होते. त्यावेळी ‘सभी करो करसेवा, वक्त की आवाज है, रामजी का काज है’, ‘जो राम मंदिर मे टांग अडायेंगा, माँ कसम जिंदा न छोडेंगे’, यासारख्या घोषणा दिल्या जात होत्या. रामशिलापूजन, कारसेवा, त्यानंतर बाबरी मशिदीच्या घुमटावर जे कोठारी बंधू चढले होते, भगवा झेंडा लावला होता, त्या कोठारी बंधूंची हत्या करण्यात आली. त्यांचे वडील नंतर कल्याणला आले होते. आनंद दिघे यांनी त्यांच्या वडिलांना कल्याणला आणले होते, तेव्हा त्यांची भेट झाली होती. ‘शरयू नदी लाल झाली’, असा अग्रलेख सामनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिला होता. लखनऊ येथे दिघेसाहेब व संगीतकार सुधीर फडके यांना अटक झाली होती. त्याच्या बातम्या छापून आल्या होत्या. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप शिवसेनेची युती झाली. तेव्हा ठाणे व डहाणू मतदारसंघांतून शिवसेनेचा उमेदवार नव्हता. ठाण्यातून भाजपचे रामभाऊ कापसे, डहाणूतून चिंतामण वनगा हे दोन उमेदवार होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी कल्याणला जाहीर सभा घेतली. हिंदुत्वाच्या लाटेवर हे दोन्ही उमेदवार निवडून आले होते. ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ ही घोषणा शिवसेनेने विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत दिली होती. त्यावेळी रमेश प्रभू यांची आमदारकी हिंदुत्वाच्या मुद्यावरून रद्द झाली होती. प्रभू व बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. शिवसेनेने वेळप्रसंगी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. उद्धव ठाकरे यांनी राममंदिराचा मुद्दा पुन्हा हाती घेतल्यानेच केंद्र सरकारला मंदिर उभारणीची जाणीव झाली. या कार्यक्रमावर पहिला अधिकार शिवसेनेचा आहे. भाजपने देशातील सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवायला हवे होते. हिंदुत्व खुजे असलेल्यांनी ठाकरे यांना डावलले, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
- शब्दांकन : मुरलीधर भवार

‘राममंदिराच्या मुद्यावर भाजप मते मागत राहिली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी राममंदिराच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, तेव्हा हा विषय उद्धव ठाकरे यांनी अजेंड्यावर आणला. ते स्वत: राममंदिराच्या ठिकाणी गेले. एकीकडे हिंदुत्व संघटनांनी एकत्रित आले पाहिजे, असे भाजपचे नेते बोलतात, तर दुसरीकडे शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी संघटनेला डावलून त्यांचे खच्चीकरण करते. सगळे माझ्याच बापाचे आहे, ही वृत्ती भाजपची आहे.’
 

Web Title: 'Khuje Hindutva supporters beat Thackeray'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.