कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, नेत्यांचे गळ्यात गळे; उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा रंगला कोपरखळ्यांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 06:20 AM2022-01-16T06:20:10+5:302022-01-16T06:22:32+5:30

प्रत्यक्ष कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत महाविकास आघाडी मजबूत करण्याची ग्वाही दिली. मात्र त्याचवेळी कोपरखळ्या, टोलेबाजी यांनीही हा कार्यक्रम रंगला. 

kharegaon bridge inauguration shivsena and ncp clash over bridge | कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, नेत्यांचे गळ्यात गळे; उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा रंगला कोपरखळ्यांनी

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, नेत्यांचे गळ्यात गळे; उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा रंगला कोपरखळ्यांनी

Next

ठाणे  : खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून गेले काही दिवस शिवसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात सुरू असलेला संघर्ष शनिवारी घोषणाबाजीने दुमदुमला असतानाच प्रत्यक्ष कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत महाविकास आघाडी मजबूत करण्याची ग्वाही दिली. मात्र त्याचवेळी कोपरखळ्या, टोलेबाजी यांनीही हा कार्यक्रम रंगला. 

मागील कित्येक दिवस राजकीय साठमाऱ्यांमुळे खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाबाबत तारीख पे तारीख हा खेळ सुरू होता. अखेर या पुलाचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी एकत्र फीत कापून केले व या राजकीय वादावर पडदा टाकला. यावेळी महापौर नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी हजर होते. 

जितेंद्र आव्हाडांची गाडी पुलावर
श्रेयावरून मागील कित्येक दिवसांपासून या पुलाचे राजकीय नाट्य रंगत आहे. शनिवारी उद्घाटनाच्या वेळेस आव्हाड आणि शिंदे यांच्या गाड्या कार्यक्रमस्थळी आल्या असता, आव्हाड यांनी आपली गाडी थेट पुलावर नेली आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते कार्यक्रमस्थळी आले.

नारदमुनी होऊ नका
महापौर नरेश म्हस्के यांचा आव्हाड यांनी समाचार घेतला. चाणक्यच राहा उगाच नारदमुनी होऊ नका, असा सल्ला दिला.

श्रीकांत शिंदेंचे टोचले कान
आपल्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावत असेल तर काळजी घ्या, असा ‘वडीलकी’चा सल्ला एकनाथ शिंदे यांनी पुत्र श्रीकांत यांना दिला.

पुलास आनंद दिघे यांचे नाव
शिंदे आणि आव्हाड यांनी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होईल असे सांगितले. यावेळी या पुलाचे नामकरण ‘स्वर्गीय आनंद दिघे उड्डाणपूल’ असे करीत या पुलाची फीत शिंदे आणि आव्हाड यांनी एकत्र कापली.

उड्डाणपुलाचे श्रेय आमचेच - म्हस्के
या उड्डाणपुलाचे श्रेय हे राष्ट्रवादीचे असल्याचा दावा त्यांचे नेते करीत होते. त्याचा समाचार घेताना महापौर नरेश म्हस्के म्हणाले, सर्वांत आधी प्रस्तावाची सूचना ही शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी २००० साली दिली होती. तसेच पाठपुरावा केला. आम्ही विकास करताना कोणत्या पक्षाचा नगरसेवक आहे, हा भेदभाव कधीच केला नाही. याउलट कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघापेक्षा कळवा-मुंब्य्राला एकनाथ शिंदे यांनी नेहमीच अधिक निधी दिल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. आम्ही राजकारण न करता आता हा पूल महाविकास आघाडीच्या प्रयत्नाने झाल्याचे सांगितले.

पोलीस हातात माईक घेऊन दोन्हीकडील कार्यकर्त्यांना कोरोनाच्या निर्बंधांची आठवण करून देत होते. मात्र जोशात असलेले कार्यकर्ते आपल्याच धुंदीत होते. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कार्यक्रमस्थळी एकाच वेळी शिंदे आणि आव्हाड यांच्या गाड्यांचा ताफा आला, आणि कार्यकर्त्यांचा जोश आणखी वाढला. अल्पवयीन मुलेही घोषणाबाजीत सहभागी झाली होती. 

Web Title: kharegaon bridge inauguration shivsena and ncp clash over bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.